Thursday, June 25, 2009
कातरवेळ
मन उधाण असते
रेती सरकत असते
जीवात जीव नसतो
ती कातरवेळ
तू हलकेच येतेस
हातात हात अलगत देतेस
हात सुटून कधी जातो उमगत नाही
ती कातरवेळ
भरती मनासारखी
ओहोटी तुझ्यासारखी
मनात काहुर कां उठते कळत नाही
ती कातरवेळ
संध्याकाळ रात्रीच्या गर्तेत जाते
मी अन् माझे मन तसेच राहते
रात्र दिवसात कधी बदलून जाते कळत नाही
ती कातरवेळ
कधीतरी कुठल्या लाटेसोबत देह माझा
तुझ्याच बेटावर सापडतो लोकांना
तो सोबत असतो म्हणुन तुला ओळख देता येत नाही
तीच अन् तीच उरते कातरवेळ !!!
प्र .......साद जोशी
पुणे
२६.०६.२००९
Saturday, June 20, 2009
उपरा
कां तरीही मी प्रेमास पारखा
काहीच उमगत नाही
मी मलाच समजलो नाही
खरेच कां मी उपरा ?
रान्गेतुनी त्या सरकत होतो
जगण्याचा खेळ खेळीत होतो
डाव मी माझा मांडीत होतो
लोक डाव साधुनी जात होते
खरेच कां मी उपरा ?
ती तशीच यायची रान्गेतुनी
डोळ्यात तिच्याही भय दिसायचे
मला कधीच ना उमगयाचे
मी तर सामान्य होतो , तरी
खरेच कां मी उपरा ?
रान्गेतुनी त्या अनेक होते
तिची छेड काढणे चालूच होते
तो क्षण आला , अन् तिडिक गेली
उचलला दगड अन् पुढचे ........
खरेच कां मी उपरा ?
मी माझ्या बाह्य स्वरूपावरून गजाआड़ होतो
तिची कशाला यात फरफट म्हणुन काहीच बोललो नाही
परत दातांखाली ओठ घेतले दाबुन ,
आमची होती खुन्नस खूप वर्षांपासून सांगुन टाकले
खरेच कां मी उपरा ?
...... हल्ली रांग तशीच असते
मी सुद्धा असतो अधून मधून
...... ती पण दिसते तशी रोजच
मी मात्र पाहतो कधी वाटले तर
कारण मी तर उपरा नां ?
प्र........साद जोशी
पुणे
२१.०६.२००९
अता बरस रे मेघा !
जगणे अशक्य झाले
जरीही दमले, पाउल सरकले
बरस रे मेघा !
नयनात माझिया मेघ
वरी पापण्याची रेघ
परी उरात सर्व दबवले
बरस रे मेघा !
कुणी पुसतच नाही
मी चालतेच आहे
पिल्लांचे जीवही शीणले
बरस रे मेघा !
दारी पोचले, घर सापडले
चूल पेटणे, भाकरी आहे
मी तर दमले आहे
बरस रे मेघा !
आई म्हणुनी हाक ऐकता
उर दाटूनच आहे
भाकर झाली घास भरवला
अता बरस रे मेघा !
आजचा हा दिवसही सरला
उद्याची हाकही आहे
रात्र झाली, डोळे मिटले पिल्लांचे
अता बरस रे मेघा !
अता बरस रे मेघा !
प्र.....साद जोशी
पुणे
२१.०६.२००९
Friday, June 12, 2009
शब्द तसेच राहिले!!!
जीव गुंतला त्या माळलेल्या गजरयावरती
गुंफून गेले श्वास जणू तो मोगरा होता
थाम्बुन गेलो पुढे न सरलो कणभर भीती
सूर उमटले ओठांवरती
तीही थबकली किंचित वळली कोपरयावरती
पाहिले जेव्हा तिने फिरुनी , एकच तो क्षण होता
उमगले ना श्वास बिलगला , वेडा होता
सूर उमटले ओठांवरती
कधीच ना मी कबुली दिली स्वत:शीच पण
जाणवते आजही मला , मी तो क्षण जिंकला होता
माझाच माझ्या जिंकण्यावर विश्वास नव्हता
अन् ... सूर उमटले ओठांवरती
प्र...साद जोशी
पुणे
१३.०६.२००९
प्रेम की ती जबरदस्ती
प्रेम की ती जबरदस्ती
जीव कायम धडकत असायचा आमचा त्यांना पाहून
कैंटीन मध्ये तर जायला लागायचे आम्हाला अधिमधी
नजर फक्त त्याचीच नाही खुपायची तिथे पाहून
एकदा तो जवळ येउन म्हणाला काही नोट्स मिळतील कां ?
मनापासून नाही म्हणायचे होते पण जमलेच नाही
परत भेट घडावी वाटत सुद्धा होते आणि नाही सुद्धा
प्रत्यक्ष आला जेव्हा समोरी शब्द ओठी उमटले नाही
एकदा ती भीती माझी सत्यात जेव्हा उतरली
मला त्याच्या डोळ्यांची जरब नाही वाटली
प्रेमात म्हणे विचारतात असे ऐकले होते
त्याने प्रेम आहे माझ्यावरी दोन शब्दात सांगितले
प्रेम की ती जबरदस्ती काहीच नाही समजले
काळजी कुणी कशी करावी हे मात्र उमगले
त्याचे नाव कॉलेज मध्ये नव्हते फारसे चांगले
मला वेडीला प्रेमात हे कधीच नाही वाटले
एक मात्र तो दिवस आला , लख्ख झाला वर्तमान
सर्व स्वच्छ दिसू लागले , सुरा चालला गतीमान
धूसर झाल्या प्रेमाच्या माझ्या सारया कल्पना
जीव होता अन् क्षणात गेला बाकी सर्व वल्गना
जीव वाहिला तुझ्यावरी असे एकदा बोलला होता
पाट रक्ताचे पाहिले मी पण एकही थेम्ब माझ्या नावाचा नव्हता
आजवरी प्रेम या शब्दाची भीतीच मजला वाटते
रोज हल्ली बहिण माझी आरश्यात पाहते ......
प्र..............साद जोशी
पुणे
१३.०६.२००९
Tuesday, June 9, 2009
रंग
1)
रंगुनी रंगात सगळ्या , रंग मुक्त केले बंद मी ,
तू जरी नसलास सोबती , स्पर्श केले बद्ध मी !
मी तशी कुणीच नव्हते , कधी कुणाची ,
फक्त आहे जीवनी या , मुक्तीसाठी लुब्ध मी !
हा स्वर आला अन् तो क्षण सरला एवढे उरले जरी ,
गुंजन असता मुक्तीचे , काहुर कायम असे उरी !
2)
त्या गहिरया रंगांच्या संगतीने संगतीचे रंग गहिरे झाले ,
पावसात नाह्ताना बंध सैल जाहले ,
एक एक अश्रु आता रंग होऊ लागला ,
शब्द शब्द रंग म्हणुनी कागदी उमटू लागला !!!
विस्कळीत
मनमौजी तो तसाच होता !
काळजीचे सूर मनातच राहिले ,
मज भूपाळी तो ऐकवित होता !
2)गणेशाचे या ध्यान करावे की ,
त्या कुम्भाराचे मौन पाहावे !
कलाकृतीला दाद द्यावी की ,
मौनाचे त्या प्रतिसाद व्हावे !
3)गुन्तवली आयुष्याची भेडोंळी ,
कधी सरळ तर कधी गुंतागुंतीची !
कधी तयार होते बाहुली तर कधी नुसतीच उरते सावली ,
कर्तव्याचा खेळ हा सारा , कधी कर्म तर कधी माउली !!!
ध्यानस्थ
तुझे मन तर निर्मळ ,
जणू वाहत्या पाण्याची झूळझूळ ,
कां खड्कानी होतेस अस्वस्थ ?
रहा त्या खडकावर ध्यानस्थ !
अंगणातील तुळस
नयन तुझे ते बोलले जे माझ्या मनी दाटले !
स्पर्शातुनी तुझ्या रोमांच अंगी माझ्या उमटले ,
नक्षत्रांचे देणे आले कुठुनी अन् कोठले !
उदार तुझ्या शपथा अन् त्यावर सर्वस्वी हा जीव वाहिला ,
पिंजर्यातील जीव माझा मुळी माझाच न राहिला !
भेट तुझी घडणार नाही , ठाउक आहे मला मुळी ,
येशील मात्र स्वनात माझ्या ही आशा नाही खुळी !
जुळलेल्या सर्व तारा , खनक तुझ्या पैनणाची ,
किणकिणते कानात माझ्या , रुणझुण तुझ्या कंगणाची !
मिळूनही सर्व सारे , वेळ वाटे मागण्याची ,
सोबतीस साद घाले , तुळस माझ्या अंगणाची !
कधी पाहिलं आहे कां कुणी ?
माझ्या पोटातलं ओठावर आलेलं कधी पाहीलेय का ?
मी नक्की कसा आणि कोण हे कधी पाहीलेय कुणी ?
तू मात्र असाच आहेस हे पदोपदी ठसवले क्षणोक्षणी !!!
भय मात्र वाटते !
पाण्यातील ओंडक्यांचे भय मात्र वाटते !
सोबतीची साथ हवी असा माझा हट्ट नसतो ,
गरज सरता सोडून जाण्याचे भय मात्र वाटते !
भैरवी
उसवलेल्या शिवणीची सल नकळत हातात रुतते गं !
तसा मी तुझा कुणीच नव्हतो असेही म्हणता येईल गं ,
बोटावर झेललेला तो अश्रुचा थेम्ब मनतळ गाठून येतो गं !
ते क्षण सरले अन् कुणीच न् उरले , आपले कुणाला म्हणू गं ,
मीही तोच तुही तीच , भवताल मात्र अजून विराणच गं !
मन सांगे एक करावे , उमेद नाही उरली गं ,
सांग अता तूच मला गायलीस कां ती भैरवी गं !
दुःख घर थाटतंय...
मनालाही ते अता आपलेसे वाटायला लागलेय !
वादळसुद्धा अत्ता अत्ता माणसासारखे वागायला लागलेय ,
झंझावात आला तरी हल्ली फुंकर वाटू लागलेय !
मनामध्ये हळूहळू
दुःख घर थाटतंय...
सावली
ती सुद्धा तुझ्याच मागे धावली !
साद घातली होती तेव्हा मी तुला ,
म्हणालीस की ओ द्यायची राहुनच गेली !
गृहीत
आयुष्यात एकदाच पण शेवटचा फसलो !
मी कधी मांडली नव्हती गणिते आपल्या सोबतीची ,
सोबत मात्र शेवटपर्यंत असेल अश्या भ्रमात राहिलो !
तशी सोबतीची सवय जडली होती ,
उगाच नको त्या गोष्टींमध्ये तुला शोधत बसलो !
आता काय उगीच शब्द बापुडे व्यर्थ जातील ,
मी मला हरवले , स्मशानात शोधत राहिलो !
हातास काही लागत नाहिये बराच वेळ झाला ,
मी वेडापीर म्हणुन जगत राहिलो अन् दगड झेलत राहिलो !
प्रसाद जोशी
22.05.2009
पुणे
कणा
कणा
आयुष्य आपल्याला हवं तसचं जगायचं असतं !
कशासाठी थाम्बायाचं ? आपण जिथून सुरु केलं तिथून जग सुरु करायचं !
आयुष्य आपल्याला हवं तसचं जगायचं असतं !
कुणीच नसतं निस्वार्थी , प्रत्येक जण स्वार्थ साधत असतो , तुम्हाला फक्त ते कळत नसतं !
आयुष्य आपल्याला हवं तसचं जगायचं असतं !
मोकळ केलं मन , फुटू दिले अश्रुंचे बांध , मग आपोआप हसता अन् हसवता येतं !
आयुष्य आपल्याला हवं तसचं जगायचं असतं !
पंखान्मध्ये बळ आलं तरी घरटं सोडायचं नसतं , एक अजुन नवं घरटं बांधायचं असतं !
आयुष्य आपल्याला हवं तसचं जगायचं असतं !
मरण दान मागायला आलं तर दान देवून नक्की टाकायचं ,
शरमेनी मान मरणाची झुकावी असचं वागायचं असतं !
आयुष्य आपल्याला हवं तसचं जगायचं असतं !
कशाला वाकायचं कुणासमोर , जग सोडून जातानाही ताठ कणा ठेवूनच जायचं
आयुष्य आपल्याला हवं तसचं जगायचं असतं !
आयुष्य आपल्याला हवं तसचं जगायचं असतं !
प्र .............साद
पुणे
०३.०६.२००९
ओळख !
तुम्ही कायम अश्याच वागता कां ? की फ़क्त अनोळखी लोकान्शीच न बोलता राहता ?
अनोळखी म्हणाल तर आपण एकमेकांना गेले दोन तास पाहतोय हो नाही कां ?
लाजली नाही बुजली ती , काहेच न बोलता हलकेच निघून गेली ती दुसरया वर्गात
मी तालीम घ्यायचो त्याच कॉलेज मध्ये तिच्याच मित्रांची नाटकासाठी तिसरयाच वर्गात !
तिची सुद्धा तालीम सुरु होती , आमच्या तालमीला तिचे सूर लाभायाचे
सर्वजण तालमीत गुंग असताना मी मात्र फ़क्त तिलाच ऐकायचो
कॉलेज मधला एकेक दिवस उगाचच सरायला लागला
तिच्या खळितल्या हसण्यात जीव गुन्तायला लागला !
मी होतो एक खुशालचेंडू , ती कायम गंभीर
विचारू कसं प्रेमाचं ? मन होतं नव्हतं खंबीर
मनापासून मनाला समजावलं ,एकदाचं विचारून टाकलं
काय सांगू मित्रांनो , आयुष्यातलं शेवटचं आश्यर्य घडलं !
तिनं हो म्हटलं आणि जग होत्याचं नव्हतं झालं
प्रेम करावं कसं हे मलाही समजू लागलं
प्रत्येक गोष्ट आता तिला पहिले समजायची
मग कधीतरी मलाच माझी ती थोडीशी उमगायची !
हे थोडेसे उमगणे नंतर नंतर कोडे वाटू लागले
कोडे सुटता सुटत नाही म्हणुन दोर सैल होऊ लागले
तिला खोटं आवडायचं नाही मला कधी समजले नाही
तिला त्रास नको म्हणुन मी संपूर्ण खरं म्हणुन बोलायचो नाही !
सुरुवात जरी मी केली तरी शेवट तिच्याच हातात होता
वीण अशी उसवून टाकली की दोरही माझ्या हाती नव्हता
सर्व काही संपल्याचा फ़क्त एक निरोप आला
उत्तर सुद्धा न घेता निरोप देणारा गेला !
आज अनेक वर्षांनी परत एकदा गाठ पडली
तिला कोडी सोडवायची होती घाई जडली
मी पण आता गुंतलो होतो माझ्या संसारात
परत कुणाला फसवावे जमणार नव्हते जन्मात
मी सगळ्या चूका माझ्याच म्हणुन सांगितल्या
शेवटचे खोटे बोललो , तिच्या भावना आवरल्या
एक खोट्या बोलण्यानी सर्व मार्गावर आले
दोन जीवांसाठी दोन संसार मोलाचे ठरले !
आजही आम्ही कधी मधी समोर येतो
ओळखतो एकमेकांना एवढेच दाखवतो
ती आता तिच्या मुलात मला शोधते , अन् जवळ घेते
माझ्याही बायकोला भेटली तर , तिच्या खांद्यावर देते !
नक्की चुकले कुठं याचा विचार आता मी करत नाही
मला त्रास होतोय याचा हे सुद्धा कुणाला समजू देत नाही
कळ जाते कधीतरी एकदाच एकदम जीवघेणी
आरशात पाहतो मी माझीच नजर केविलवाणी !
प्र...............साद जोशी
पुणे
०५.०६.२००९
वात्सल्याचं देणं
माता !
कुणाला लक्ष्मणाच्या आईचं नाव आठवतयं काहो ?
वनवासाला जाताना तिनंही फोडला असेल टाहो !
लक्ष्मणाची उर्मिला आठवते कधी का कुणाला ?
लवकुशासारखे मूल व्हावे वाटले असेल नां तिला !
मात्रुत्वाचा अपमान झाला म्हणुन धरित्रिने सीतेला उदरात घेतले ,
जीवंतपणी अनेक मृत्यु उर्मिलेने भोगले !
जीव दशरथाचा जडला , कैकयीला एक वर दिधला ,
माता होती वर वापरला , कोपून तिच्यावरी भरत मात्र चुकला !
तिचे देणे वात्सल्याचे होते यात मुळी शंकाच नाही मजला
मांगल्य होते की नव्हते या निर्णयाचा हक्क नाही आपुला !
2)
राधेय !
वरदान लाभले तिजला , पण शाप सोबती जडला ,
तो आला जरी जन्मास , सोडुनी त्यास तिने दिधला !
मग तपे लोटली अनेक , जीव व्याकुळच राहिला ,
दान दिले न मातेचे , लागले दान मागायला !
पुत्र तिचा तो थोरच ठरला , दिल्या दानाला जागला
पाच पुत्र तसेच राहिले , चक्र अन् प्राण मात्र रुतला !
काय कहाणी कशी विराणी त्या कुंती मातेची
कुणी न पुसले अश्रुही थिजले , राधेला कुणीना पुसले !
गेल्यावरती प्रश्न न उरला , तो कौन्तेय की राधेय ,
त्या तीरावरती अर्घ्य सुद्धा न त्यास कुणी निधला !
जरी जन्मला कुंतीपोटी , जीव राधेचा होता ,
प्रश्नच न उरला तो कौन्तेय की राधेय , पुत्र राधेचा निजला !
प्र ......... साद जोशी
पुणे
३१.०५.२००९
3)
चार चक्रे घुमती त्या मिश्रणाकरीता
पाउल पड़ते पुढे घमेले टाकण्याकरीता
लक्ष मात्र तिचे त्या झोळीकड़े फिरता
हलकेच पान्हा ओथंबतो त्या पिलाकरिता !
मग मुकदमाची हाक , फिरते पाउल मागे
पदर भिजुनिया जातो , लक्ष न कामात लागे
राहून जाते देणे , दाण्याची आग पोटात
वात्सल्याचे मांगल्य होते , दिसती दोन घास ओठात !
जात न उरते पात न उरते , ध्यास तिचा घास कमवणे
उरते फक्त भुकेची आग , घमेली ओतीत जाणे
ओठातली रेती , पोटातच जाते उरते दुर्लक्ष करणे
ममत्व सारे उरीच शमते , मग कसे स्मरावे वात्सल्याचे देणे !
प्रसाद जोशी
पुणे
२५.०५.२००९
4)
एका उनाडश्या कोपरयावर
राखेतुनी तिला शोधीत होतो उगीचच !
गुरूजी आले , मुठभर राख अन् अश्म घेवुन चला म्हणाले ,
आठवणीन्ची राख होत नाही , सगळ्या लोकांना पुढे व्हा म्हणालो !
एका उनाडश्या कोपरयावर चहा बिडी , तिने जाताना नक्की पाहिलं होतं
मी मानसिक तयारी करून गेलो , ताट आवडीच्या पदार्थांनी सजलं होतं !
जेवण झालं , खूप मज्जा आली , समोर सिगरेटचं पाकीट होतं ,
ती आई होती , समजुन सुद्धा न समजल्या सारखं वागणं तिला अवगत होतं !
श्वास कुणाच्या हातात नसतो म्हणतात , चुकीचं आहे ,
ती नळी काढायची की ठेवायची विचारलं , श्वास माझ्या कुडीचा आहे !
निर्णय कठोर होवून घ्यावाच लागतो , चुकीचं आहे ,
ती जगावी की जावी , हे तिच्या ती आयुष्याचं देणं आहे !
वात्सल्याचं देणं अजुन पुरेसं देवून व्ह्यायचं होतं ,
आईचं जगणं त्या नळीवर अवलंबून होतं !
तिथेपण तिनं मला अड़वलं नाही , निर्णय मला घ्यावाच लागला नाही ,
निघून गेली अलगद कळलं सुद्धा नाही , देणं देण्याची वेळ माझ्यावर आलीच नाही !
एक बोचणी कायमची राहिली माझ्या उरात ,
कधीच कुणाला कळली नाही !
वात्सल्याचं देणं अजुन पुरेसं देवून व्ह्यायचं होतं ,
तिचं असं जाणं माझचं मला पटलं नाही !
प्रसाद जोशी
पुणे
२५.०५.२००९
5)
वात्सल्य की मातृत्व
वात्सल्याची तिच्याकडे कधी कमी नव्हती !
हे देणं मागावं तर कुणाकड़े अन् कसं ?
आपल्या लोकांनी दिलं तर ते दान कसं ?
एक दिवस तिच्या नजरेस ती पडली ,
खंतावनारी नजर तिची पटकिनी खुलली !
मागणे न लाजता तिने मागुन टाकले ,
यशोदे रुच्यापाने होसुद्धा तिने म्हणुन टाकले !
मग मात्र सुरु झाले मात्रुत्वाचे खेळ ,
दिवस तिला गेले हिला पुरत नव्हता वेळ !
मग एकदाची ती वेळ आली ,
मूर्तिमंत दान देण्याची वेळ तिच्यावर आली !
तराजू आता अचानक एका बाजूला कलायला लागला ,
वात्सल्य की मातृत्व यांचा लढा वाढायला लागला !
वात्सल्यानी पोट भरणार नाही याची खात्री होती तिला ,
देणं देण्याची वेळ आली हे काही मान्य होत नव्हते तिला !
वात्सल्य अन् मातृत्व अता कागदोपत्री आलं ,
त्या पिल्लाचं मात्र एक खेळणे झाले !
दोन दिवसांचा जीव मुक्यानेच बोलू लागला ,
मला दोन आया आहेत असे जगाला सांगू लागला !
तिला अन् हिला त्याची भाषा काही कळत नव्हती ,
त्याला यांची तगमग अत्ता समजणार नव्हती !
वात्सल्याचं देणं मोठं की मात्रुत्वाचं यावर एकमत होतं नव्हतं ,
भुकेसाठी कुठे पहावं त्याला कळत नव्हतं !
मग मात्र एकदा त्याचा टाहो कुणालाच ऐकू आला नाही ,
भांडणाच्या नादात त्याच्याकडे लक्षच गेले नाही !
वात्सल्य की मातृत्व याचा वाद काही संपेना ,
देवानं दिलेलं देणं कधी परत वाटेवर गेलं कुणालाच उमगेना !
आता फ़क्त काहूर उरलं ,
देणं की घेणं सर्वच संपलं !
मातृत्व तर त्याचक्षणी कोलमडलं ,
वात्सल्याचं देणं द्यायचंच राहून गेलं !!!
प्रसाद जोशी
पुणे
२३.०५.२००९
शीळ तीच घालतो , एकटा पुन्हा पुन्हा
व्ह्यायचे ते अश्रु आता , फ़क्त पावसात पुन्हा
पाउस वेडा जीवघेणा , जागवतोय सर्व जुन्या खुणा
मीच मला सावरतो , आठवुनी जुन्या शपथा पुन्हा
एक तीच वेळ होती , समजले कधीच नाही जना
मीच जखमा लपवितो , रिचवुनी पेले पुन्हा
दिसतेस बाजारात आता , ओळख ना काही खुणा
सारतेस बट तशीच , सहन करतो त्रास पुन्हा
मी कसा होतो , ठाउक होते फक्त माझ्या मना
त्यास देखिल गप्प करितो , झाला प्रेमाचा गुन्हा
फिरुनी तसाच सावलीच्या , चालतोच कुणाविना
शीळ तीच घालतो , एकटा पुन्हा पुन्हा
शीळ तीच घालतो , एकटा पुन्हा पुन्हा
प्र...............साद जोशी
०८.०६.२००९
पुणे
ही म्हणे त्याच्या प्रेमात पडली
कायम सांगायच्या मैत्रीणी आहेस तू खुळी
तिचे वास्तव तिच्या ताईच्या स्वप्नासोबत विरले होते
तिच्या दृष्टीने प्रेमबीम सगळे एकदम झूठ होते
कसा कोण जाणे तो तिच्या एकाएकी समोरी आला
तिच्या वह्या एका दिवसासाठी द्याल कां म्हणाला
नाही तिला म्हणवले नाही , कसे ते तिला कळलेच नाही
स्वप्नातही त्याची खळी , सकाळच्या आरश्यातुनही गेली नाही
मग तो येतच राहिला , आयुष्याचा भाग बनला
व्यापून टाकले आयुष्य , तो फक्त तिचा उरला
वापर होतोय समजत होते , उमजत मात्र काहीच नव्हते
उमजण्याचे वय नव्हते , त्याने तिला फक्त वापरले होते
आजही खळी पाहिली की तिच्या मस्तकात तिडीक जाते
पुरुष जातीवरती प्रत्येक कार्यक्रमात ती जहाल बोलते
दर कार्यक्रमानंतर तिचा खूप उदो उदो होतो
घरी आल्यावर तिचा आरसा फक्त तिच्याशीच बोलतो
फसवले त्याने यात काही शंकाच नाही
आपण फसतोय हे तिला समजले नाही
चूक तर हिच्याकडून घडली
ही म्हणे त्याच्या प्रेमात पडली
प्र................साद जोशी
पुणे
०८.०६.२००९
सूर उमटले ओठांवरती
साद तिची कानी येता
सूर उमटले ओठांवरती
प्रतिसाद द्यावा वाटला तेव्हा
शब्द संपले !
याद आलीच तिची आता
सूर उमटले ओठांवरती
दर्द दाटला कंठात तेव्हा
शब्द संपले !
लय एकटी ती जगते गाता
सूर उमटले ओठांवरती
कवितेचे गाणे झाले तेव्हा
शब्द संपले !
माझे मीपण न उरले आता
सूर उमटले ओठांवरती
कविता राख झाली तेव्हा
शब्द संपले !