Thursday, July 30, 2009
आता माझ्या स्वप्नालाही मी आपलसं केलं!!!
माझं म्हणे कुणाशीतरी लग्न झालं
बाशिंग तसं मी बांधून तयारच होतो
पण बरं झालं माझं एकदाचं लग्न झालं
स्वप्नातल्या मीच मला हळूच उठवलं
पडत्या अंतरपाटातून तिला आपलसं केलं
मित्रांनी उचललं तेव्हा मी जरा चिडलो होतो
पण बरं झालं माझं एकदाचं लग्न झालं
मी मला चिमटा काढून हळूच जागं केलं
चादर बाजूला करून हलकेच बाजुला पाहिलं
सहा जणांच्या रूम मध्ये मी एकटाच जागा होतो
पण बरं झालं माझं अश्यावेळी माझं लग्न नाही झालं
आंघोळ करून मी स्वत:ला सत्यात आणलं
एक स्वत:ची जागा हवी हे मलाच मी सांगितलं
मला समजले लग्न म्हणजे जबाबदारीचा डोंगर असतो
म्हणुन म्हणतो बरं झालं माझं अश्यावेळी माझं लग्न नाही झालं
आज माझं खरंखुरं लग्न झालं आहे
एक पिल्लाची जबाबदारी अंगावर आहे
कामावरून बायको शप्पथ दमून येते
पिल्लू रात्रभर जागलं तरी मला जागणे आहे
आता नाही वाटत मला लग्न का झालं
नक्की झेपेल मला कितीही ओझं जगण्याचं असलं
लग्न म्हणजे सुखदुःखाचं देणं घेणं असतं
आता माझ्या स्वप्नालाही मी आपलसं केलं
आता माझ्या स्वप्नालाही मी आपलसं केलं
प्र....साद जोशी
पुणे
३१.०७.२००९
Monday, July 27, 2009
मला काय त्याचे ? मी तर केव्हाच घर गाठले होते !
कुणीतरी त्या ट्रक खाली आला म्हणे
मला त्याचे काय करायचे ? मी बाजुनी निघून आलो
मला काय त्याचे ? मला लवकर घर गाठायचे होते !
हजार तरी अपघात होत असतात हल्ली रोज रस्त्यात
आपण तरी कुठे कुठे थाम्बयाचं ? अन् कशासाठी ?
नीट नाही नां चालवता येत गाड़ी मग बसनी फिरावं की
मला काय त्याचे ? मला लवकर घर गाठायचे होते !
आज तसा एकदम ख़ास दिवस आहे माझ्यासाठी
पगार वाढला हे सुद्धा सांगायचे आहे आणि तिचं पण
सारखं सारखं डोळ्यासमोर त्या अपघातानी यावं कशाला ?
मला काय त्याचे ? मला लवकर घर गाठायचे होते !
घरी आलो तर इमारतीत एकच हलकल्लोळ माजला होता
कुणाचातरी म्हणे अपघातात जीव गेला होता
आयला म्हणजे मगाशी जो अपघात पहायचे टाळले होते
मला काय त्याचे ? मला लवकर घर गाठायचे होते !
तड़क तसाच वर आमच्या मजल्यावर आलो
गोंधळ आमच्याच घरात उडाला होता असे दिसले
भान हरपत होते पण सावरले स्वत:ला आणि पुढे झालो
मला काय त्याचे ? मी तर केव्हाच घर गाठले होते !
मला काय त्याचे ? मी तर केव्हाच घर गाठले होते !
प्र......साद
पुणे
२८.०७.२००९
Monday, July 20, 2009
खडक
मी दिसतोही
मी असतोही
मी स्तब्ध
मी निशब्द
मी पाण्यात
मी जमिनीवर
मी खोलात खोल
मी गर्त अनमोल
मी एकटा
मी निर्बंध
मी भिजलेला
मी सुकलेला
मी आकार
मी विकार
मी हरवलेला
मी गवसलेला
मी गुंग पाण्यात
मी धुंद लाटात
मी ज्वाला एक थंड
मी निसटलेला खंड
मी शांत निर्माल्य
मी प्रशांत खडक ..............
प्र.... साद जोशी
पुणे
२०.०७.२००९
Sunday, July 19, 2009
कारण तो समुद्राकाठचा खड़क !
कारण तो समुद्राकाठचा खड़क !
झीजणे त्याचे, वरी शेवाळ
कारण तो समुद्राकाठचा खड़क !
मौनाचे असे भांडार, जरी पायी कालवे
कारण तो समुद्राकाठचा खड़क !
मी मुग्ध होउनी बसतो, दरी खोर्यातुनी फिरून
कारण तो समुद्राकाठचा खड़क !
मी चिम्ब चिम्ब हा भिजतो, घेतो कात नवीन
कारण तो समुद्राकाठचा खड़क !
प्र.....साद
पुणे
२०.०७ .२००९
Friday, July 10, 2009
साथ तुम्हारे खु़दा तो है !
शिकवा कभी न् करना
गैर तो गैर होते है ,
रुसवाई अगर है खुदसे
साथ तुम्हारे खु़दा तो है !
Thursday, July 9, 2009
बरे झाले गेलीस तू ,
जीवघेणा वार होता
माझीच ती कट्यार होती
काळ वेळ लावित होता
.......
बरे झाले गेलीस तू ,
आरसा भंगुन गेला
अन् तडे सोबतीला
पखरण त्या तुकड्यांची
घरभर पसरली होती
.......
बरे झाले गेलीस तू ,
सरण माझे मीच नेतो
मीच देतो अग्नी मला
राख सुद्धा सरकली नाही
वाराही तेव्हा स्तब्ध होता
.....
बरे झाले गेलीस तू ,
प्र....साद जोशी
पुणे
१०.०७.२००९
Wednesday, July 8, 2009
शेवटची कविता !!!
कोण जाणे कशी सावली आली !
सडा आता पडणार नाही
वेळ मावळण्याची आली !
फुले पारीजातकाची केशरी हात माझे
राहिले आता मात्र कोरडे !
मी रमलो या ठिकाणी
वेळ निघण्याची आली !
कृपा करा अन् जाऊद्या मला आता
केली न् गायली भूपाळी जेथे !
उमगली किम्मत स्वत:ची
वेळ सरून गेली !
वेळ मावळण्याची आली !
प्र....साद जोशी
पुणे
०९.०७.२००९
Monday, July 6, 2009
प्रत्येकाच्या आयुष्यात एक् बाबा यायला हवा,
मलाही होती शंका जो वरी बाबा नाही भेटला !
मी म्हणालो त्याला मी प्रयत्न करीनच,
हसला अन् म्हणाला हे ही दिवस जातीलच !
कृपा असावी असे नव्हते कधी वाटले,
त्याचा हात फिरता अश्रु मात्र सांडले !
म्हणाला मला मान मागुन मिळणार नाही,
स्वत:हुन द्यावे मग अपमान नाही !
स्वत: द्यायची सवय कधीच नव्हती,
हात उठतो कशाला याची जाणीव मात्र होती !
अशक्याचे शक्य होते हे त्यानेच दावले,
मदतीचे हात अनेक पुढे आले !
विश्वास बसेना माझ्याच नयनावर,
भीड़ चेपली करू स्वत: लागल्यावर !
नाणे दोन बाजुंचे असते अशी समजूत होती,
दान आपलेसुद्धा पडेल याची कायम भीती !
आरसा दाखवेल कुणी माझा मला सुधारलेला,
यावरी विश्वास बसायला मात्र वेळ गेला !
बदल घडेल माझ्यात कधी असे कधीच नव्हते वाटले,
दुसरेही विसम्बले मदतीकरीता अश्रु डोळा दाटले !
प्रत्येकाच्या आयुष्यात एक् बाबा यायला हवा,
देवानेही प्रत्येकाला दिला असतो प्रकाशाचा दिवा !
पेटवावा दिवा उजेडाकरीता न् वापरता जाळण्यासाठी,
उमगले काठी उगारण्यासाठी नसतेच असते ती फक्त सोबतीसाठी !
प्र.....साद जोशी
पुणे
०६.०७.२००९
Saturday, July 4, 2009
मीपण जपायचं की माझं स्वत्व
मी हटायचे की हट्टाने रेटायचे
प्रश्न तसाच राहतो
भीड़ चेपायची की भीक घालायची
प्रश्न तसाच राहतो
मीपण जपायचं की माझं स्वत्व
प्रश्न तसाच राहतो
कुढत जगायचं की जगवायचं अस्तित्व
प्रश्न तसाच राहतो
अभिमान जपायचा की स्वाभिमान
प्रश्न तसाच राहतो
मोडून वाकायचं की वाकून मोडायचं
प्रश्न तसाच राहतो
पेटून उठायचं की कुणीतरी पेटायचं
प्रश्न तसाच राहतो
झोकुन द्यायचं की वाकून पहायचं
प्रश्न तसाच राहतो
आपणच आपलेपण सिद्ध करायचे
विस्तव आला तरी स्वत्व आता जपायचे
शिवबा नाही होता आले हे तर चालायचेच
नंगी तलवार उचलता येते एवढे तरी करायचे
मग प्रश्न कधी प्रश्न उरणार नाहीत
उत्तरे कुणाकडे मागावी लागणार नाहीत
आता फक्त ताठ कणा अन् मानानं जगायचं
पाठीवरचा वार छातीवर घ्यायला फक्त शिकायचं
प्र.........साद जोशी
पुणे
०५.०७.२००९
सांग आवरू कसा हा पसारा ?
होता केलास तेव्हा तू इशारा
गेलीस आता सोडुनी
सांग आवरू कसा हा पसारा ?
pra....saad
अश्वत्थामा अमर आहे
आठवणी मेणबत्ती सारख्या
हातात घेवून फिरत रहातो
उजेड जगाला देतो
चटके हाताला घेतो
हीच साठवण आहे
तुझ्या आठवाची
जगणे जगत रहातो
मरण पेलत जगतो
उपयोग नाही कशाचाच
सर्व काही व्यर्थ आहे
जखम भाळी घेवूनच
अश्वत्थामा अमर आहे
प्र....साद जोशी
पुणे
०४.०७.२००९
Friday, July 3, 2009
मी नसतोच ...........
मी वादळ
मी निरभ्र
मी मळभ
मी सर्वांगी
मी विरागी
मी भैरवी
मी विराणी
मी तूच
मी नसतोच ...........
प्र.......साद जोशी
पुणे
०४.०७.२००९
विस्कळीत
मी गडद ,
मी गर्द !
मी सहज ,
मी सर्द !
मी दृश्य ,
मी अस्पष्ट !
मी मर्त्य ,
मी स्वप्न !
2)
एक आवर्त , कधीच न उमगणारे
एक सत्य कधीच न उलगडलेले
एक किनारा थांग न सापड़णारा
एक अन्याय कधीच न थांबणारा
एक माणूस सतत लढणारा
एक कोळी सतत झुंज देणारा
एक राधेय स्वत्व अन् अस्तित्व विसरणारा !
प्रसाद जोशी.
१४.०४.2009
3)
मी तीर्थ
मी सर्वार्थ
मी जळी
मी स्थळी
मी आवेग
मी संकल्प
मी झंझावत
मी विकल्प
Thursday, July 2, 2009
जगाने जगला म्हणावे !!!
डोळ्यातूनच जे झिरपते तेच अश्रु असतात कां ?
मनातल्या मनात जे झिरपते त्याला काय म्हणावे ?
जे जे दिसते ते ते सत्य असतेच कां ?
जे जे कळते कधी उमगते त्याला काय म्हणावे ?
आस असावी की कास धरावी कुणी तरी सांगेल कां ?
घुसमट होते आतल्या आत त्याला काय म्हणावे ?
प्रतिसाद द्यावा की वाट पहावी सादेची कां ?
हाकेस सुद्धा ओ न यावी याला काय म्हणावे ?
चालत रहावे की थाम्बुन जावे कुणीतरी सुचवेल कां ?
वाट आंधळी की रस्ता चुकलेला याला काय म्हणावे ?
जीवन जाते सरुनी तरी कां जगलो उमगेल कां ?
कलेवराची राख न उरली, जगलो कसे म्हणावे ?
प्र.....साद जोशी
पुणे
०२.०७.२००९
Wednesday, July 1, 2009
कॉलेज
नाक्यावर उभे राहून आमचे जेव्हा टेबल पंखे व्ह्यायचे नां तेव्हा आम्ही सुटलेलं कॉलेज पहायचो ,
या टोकापासून त्या टोकापर्यंत ती जाइतो आम्ही फक्त पहातच रहायचो !
टोक एकदा शेवटचं यायचं , मग तिनं मागं फिरून पहायचं ,
गेल्याची खात्री झाली की आम्ही परत पहिल्या टोकाकडे टक लावून रहायचं !
नाक्याच्या त्या जागेवर माझा ठरलेला स्पॉट होता ,
अनेक ग्रुप यायचे अन् जायचे माझा दिव्याचा खाम्ब असायचा !
सीनियर आणि ज्युनिअर कॉलेजच्या वेळा मला त्या काळी पाठ होत्या ,
माझी सिगरेट आणि चहाची वेळ ठरलेला भट कधीच नाही चुकवयाचा !
बाबांची यायची ट्रेन प्रत्येकाला ठाउक होती त्यावेळी ,
माझी सिगरेट आपोआप दुसरयाच्या हातात सहज ठरवल्यागत जायची !
आई मात्र यायची भाजी खरेदीला चुकून कधीही वेळी अवेळी
अख्या ग्रुपची मला जपायला तारांबळ फक्त त्याच वेळी उडायची !
घातलेली जीन धुवून किती महीने झाले याची काही मोजदात नसायची ,
चुकून घातली नाही की मगच ती जीन पाण्यात जायची !
अधून मधून कॉलेजच्या कैन्टीनला आम्ही पण जायचो ,
टेबलाचे तबले कधी झाले हे न कळताच परत यायचो !
आज बायकोसोबत फिरताना माझा टेबल पंखा होत नाही ,
एक कटिंग मारतोस कां अशी हाक सुद्धा येत नाही !
कड़ेवरच्या छोकरीला त्रास होईल म्हणुन सिगरेट हातात धरत नाही !
हल्ली मुलींनी काका अशी हाक मारली तरी त्रास काहीच होत नाही !
दिवस जुने सरले होते , आठव सोबत उरले होते ,
प्रत्येक मित्र आता दुरूनच हात करतो !
ठाउक असते मलासुद्धा आता असेच वागायचे ,
उगाच कशाला जुन्या गोष्टींना उगाळत बसायचे !
ठाउक असते मलासुद्धा आता असेच वागायचे ,
उगाच कशाला जुन्या गोष्टींना उगाळत बसायचे !
प्र.............साद जोशी
पुणे
०५.०६.२००९