Tuesday, July 6, 2010
घरात एकच कप तुझ्या नावाचा असेल !
जी मी कधीच पाठवली नव्हती !
माझा पाठपुरावा करताहेत तुझी निरुपयोगी जीवनसूत्र ,
मी कायम तुझीच असले तरी जी कधीच पाळली नव्हती !
असेल कां कधी पुढला जन्म ?
जो कुणीच कधी पाहिला नाहीये !
घेवून येशील कां कधी उत्तरासकटचा प्रश्न ?
मला आयुष्यभर तुझ्यासाठी दीपस्तंभ व्हायचे नाहीये !
कधीतरी अशी निजलेली रात्र येऊ देणार आहेस कां ज्यात तू नसशील ?
अख्या अंगभर गुरफटून घेतलेल्या गोधडीतल्या तुझा गंध तसाच असेल !
येवू देणार आहेस कां कधी अशी पहाट ज्यात तुझी स्वप्ने नसतील ?
चहा करेन एकटीसाठी सकाळी , घरात एकच कप तुझ्या नावाचा असेल !
तुला कधी समजेन मी खरी ?
फलाटावरचा बाक अजून वाटच पहात बसेल !
मी कितीदा दिली मनापासून हाक तुला ठावूक तरी आहे कां ?
मी स्टेशनवर पोचेतो गाडी नेहमीसारखीच गेली असेल !
प्र...साद जोशी.
पुणे
०७.०७.२०१०
Monday, June 28, 2010
स्वत:चेच कां रडू यावे ?
न कळे कधी कुणा काय मनी वसे !
स्वत्वाचा शोध जर खोल घेशी ,
तव हृदयी तुजला तव मम गवसे !
ठाव हृदयाचा कधीच कुणा न कळला ,
कधी तो चुकला अन् कधी गवसला !
जो वरी समजे आज समजला ,
क्षण हातचा कधीच निसटला !
पारयापरी हे कायमचे पुसटसे क्षण ,
धावू पाहता निसटुनी जाती !
काळालाही बघ थांब म्हणावे ,
हाती उरती फक्त वाळूचे कण !
अर्थ आंधळ्या मनतळाचे ,
कुणा न् उमगले आजवरी !
हृदयाचा ह्या कां बांध फुटावा ,
स्वत:चेच कां रडू यावे ?
प्र....साद जोशी.
पुणे
२९.०६.२०१०
Friday, May 14, 2010
वचन सुखी असल्याचे ?
आपले भोग तर आपणच भोगायचे असतात
जर माझे भोग मीच भोगणार असेन तर
माझे हसूसुद्धा मीच ठरवेन कधी हसायचे ते !
परवाच सुखी माणसाचा सदरा घातलेला माणूस भेटला मला
त्याच्या सदरयालाही नजर लागली आहे असे म्हणत होता
सदरा काही बदलला नाहीये त्याचा अजिबात पण
अपेक्षांचा खिसा सुख कमी करतोय म्हणाला !
मी गालातल्या गालात हसल्यावर चिडला माझ्यावर
म्हणे कदाचित आपल्यापैकीच कुणाचीतरी नजर लागली असेल असे म्हणाला
खरे सांगू मी त्याला उत्तर द्यायच्या भानगडीत नाही पडलो
आरसा पाहिला होता थोड्याच वेळापूर्वी त्यामुळे माझे अस्तिव मला स्पष्ट ठाऊक होते !
माझ्या जगातल्या प्रत्येकासमोर खळखळून हसतो मी
अंतरीच्या गोष्टींना कधीच चेहऱ्यावर दिसू देत नाही मी
कमीतकमी हसू पाहिल्यावर माझ्यासमोर अस्पष्टसे कां होईना हसतात काही जण
मी माझ्याच अश्रुंचे भांडवल केले तर डोळे पुसायला किती हात येतील पुढे यावर शंका आहे !
एखाददोन हात येतीलसुद्धा फक्त माझ्यासाठी
ते अश्रूंना अन् मला पुसायला असतीलच याची खात्री कशी द्यावी ?
न् पेक्षा माझे निर्झर हसणे वाटत जातो असाच वाटेवाटेवरून
माझ्या अश्रुंचे दोन थेंब अर्घ्य म्हणून पडले त्यात तर कुणाला समजणार आहे ?
प्र......साद जोशी
पुणे
१५.०५.२०१०
Thursday, May 13, 2010
एका आईचे आईपण
कधीतरी इतकी दमशील की नको वाटेल हे जगणे
पण तसे करून कधीच चालणार नाही
कारण तुझं असणे आणि जगणे तुझ्या हाती नाहीयेच मुळी !
तुला आईपणाचा कंटाळा येऊन पण चालणार नाहीये
जगानी उगाचच आईला इतके मोठेपण देऊन ठेवले आहे की
तू सुद्धा त्यातून सुटणार नाहीस कदाचित तुझी तशी इच्छाही नसेल
पण एक स्वतंत्र अस्तित्व शोधायचे असेल तर ह्या बंधनांना थोडे सैल करावे लागेल !
आईचे आईपण कधी संपते कां हो ? मोठा गमतीशीर आणि क्लिष्ट प्रश्न आहे
तुझा तुलाच सोडवायचा आहे पण सुटायचा नाही याचीसुद्धा खात्री आहे मला
मग नक्की काय करायचे असा प्रश्न पडेल तुला .....
हा प्रश्न कायमचा आहे , मुळी हा प्रश्नच नाही हा आहे तिढा .....
ह्या तिढ्याशी झुंजत झुंजतच जगायचे आहे तुला
दमलीस तरी आईपण सोडणार नाही तुला
आधी नवऱ्याची आई झालीस , मग मुलांची आणि नंतर नातवंडांची
दमलीस तरी आईपण सोडणार नाही तुला .. कधीच ....
प्र.....साद जोशी
पुणे
१४.०५.२०१०
Sunday, April 11, 2010
तसे फारसे काही बदलले नाहीये .... आम्ही आता ऑनलाईन भेटतो ......
तसे फारसे काही बदलले नाहीये ....
आम्ही आता ऑनलाईन भेटतो ......
काल एक खूप जुना मित्र अचानक ऑनलाईन भेटला बऱ्याच वर्षांनी ,
पूर्वी आम्ही तसे लाईन मधेच भेटायचो फक्त ती रेल्वेची असायची !
पूर्वी गाडी किती वेळ लेट म्हणून स्टेशन वर गप्पा मारायचो
अन् आता तुझ्या आणि माझ्या गावांमध्ये किती तासांचा डिफरन्स आहे याच्या गप्पा मारतो
त्यावेळी ८.४० चुकली की ९.२० ची फास्ट पकडूया म्हणून platform बदलायचो
आता तुझी जेवायची आणि माझी झोपायची वेळ झाली म्हणून गप्पा मारतो ,
तसा तो पण नाही बदलला किंवा मी पण नाही
बदलली आहे ती फक्त परिस्थिती आणि स्थान
त्यावेळी मी दादरला आणि तो भायकळाला उतरायचा
आता मी पुण्यात फिरतो आणि तो सिंगापूरला असतो
तसा फार काही बदल झाला नाहीये आयुष्यात दोघांच्याही
ठिकाणे फक्त बदलली आहेत , मन अजून तसेच ताजे आहे
त्याच्या लग्नाच्या वेळी मी एकटा होतो आणि अल्बम मधील फोटोत पण होतो
आज मी पण दुकटा आहे , खंत एकच आहे माझ्या अल्बममधील त्याची जागा रिकामी आहे !
तसे फारसे काही बदलले नाहीये ....
आम्ही आता ऑनलाईन भेटतो ......
प्र.....साद जोशी
११.०४.२०१०
Saturday, March 20, 2010
माझ्या SMS कविता .......
१)
रुतल्या मनात त्या सहजी खुणा
ना पुसले ना पाहिले त्या व्रणा
आपुले ओझे माझेच मी वाहित राहिलो
तेच जुने रान , अन् आपुल्या पाऊलखुणा !
२)
पहाटेची साद
कोकिळेचा नाद
वासुदेवाची वीण
मम मित्रांची याद !
३)
हरण्याचा तुझा काही स्वभाव नाही
माझाही जिंकण्याचा अट्टाहास नाही
मी शब्द सांडणे बंद केले
तुला वाटले तू युद्ध जिंकले
वादाला प्रतिवाद हे एकच काही उत्तर नसते
युद्धात सर्व क्षम्य असले जरी
राधेयाचे स्थान अढळ असते !
४)
मी परत एक चहा मागणार
तिच्या सांगण्यानुसार माझा फक्त सहावाच कप असणार
चहा किती प्यावा याचे लिमिट सुद्धा तीच ठरवणार
मी माझा हट्ट अजिबात नाही सोडणार
ती सुद्धा तिचा शब्द खाली नाही पडू देणार
शेवटी उठून माझेच मला चहाचे आधण ठेवावे लागणार
काय रे देवा !!!
( संदीप खरे माफ करा )
५)
काही जुन्या जखमा , काही आठवणी
खपल्या पडल्या , व्रणाच्या मात्र साठवणी !
६)
आठव येतो तो
बरसल्यासारखा येतो
मेघ निळेशार अन् डोळे मिट्ट भरून येतात !
पायरव जरी जाणवला तरी ......
हलकेच डोळे टिपून घ्यावेत
शेवटची भेट टीपकागद दिल्याची आठवण स्वत:ला करून द्यायला
एकदा दिलेल्या जखमा बुजल्या की व्रणाकडे कधीच नाही पहायचे
व्रण बाळगणाऱ्याला त्रास होतो !!!
७)
मी समजावितो मनाला
आयुष्याचे गाणे सुंदर सुरेल आहे
मन होते फुलपाखरू
गंध नाही अबोलीत पण
प्राजक्त क्षणभंगुर आहे !
८)
क्षणाक्षणाला तुझी आठवण
सोबत माझ्या पळभराची साठवण
उर अजून तुझ्याचसाठी धपापत आहे
त्यावरून मी जिवंत असल्याची लोकांची समजूत आहे !
९)
प्रेमाचा कां कधी दिवस असतो ?
प्रेम म्हणजे काय असते ?
आपलेपणाला मनापासून आपलेपणानी दिलेली साद की तोच असतो प्रेमाचा दिवस
अन् त्याला आलेला प्रतिसाद म्हणजे प्रेम ...
आपलं माणूस आपलं ...............
१०)
मातीतुनी गंध फुले ,
जणू घन पावसाचा सडा !
कुणा कधी कळेल कां ,
कसा भरला हा आसवघडा ?
प्र....साद जोशी
पुणे
२०.०३.२०१०
Wednesday, March 17, 2010
आनंदगीत
जगणे माझे आनंदगीत आहे
हृदय भंगणे ही तर जनरीत आहे
हरवली जरी किती नाती इथली
मनी माझ्या सर्वांसाठी प्रीत आहे
Tuesday, March 2, 2010
जगण्याचा हा खेळ
हात केशरी, तरी रिताच दिसला
गंध आयुष्यभर उरला
मी उदास .......
निरांजनाची वात तेवली
गाभाऱ्यात उजेड उमटला
क्षणात तोही मावळला
मी उदास ........
जगण्याचा कंटाळा आला
भरतीमध्ये जीव लोटला
श्वास लाटेवर तसाच राहिला
मी उदास ......
भीक म्हणुनी म्हणले जगला
पदर आईचा उगीच विरला
जगण्याचा हा खेळ विस्कटला
मी उदास ......
प्र....साद जोशी
पुणे
०३.०३.२०१०
काळजाच्या कुपीत
नाव माझे , आवाज माझा ! कदाचित मी कोण हे देखील !!!
जरी विसरलास आज मजला,
तरी काळजाच्या कुपीत असेल अस्तित्व तुझे कायम !!!!
Pra,,,,saad
Monday, March 1, 2010
केसरबागेची रंगपंचमी !
आज खरेच खूप काही गमावल्यासारखे वाटते आहे ,
मधल्या गच्चीतली होळी & रंगपंचमी आता कुणालाच खेळता येणार नाही !
आज खरेच खूप काही गमावल्यासारखे वाटते आहे ,
खरे तर त्याही वेळी दोन वेगळ्या इमारती होत्याच की ,
पण त्यावेळी मधला जिना दोन्ही बाजूंना जोडणारा होता !
आताही दोन विंग आहेत पण जोडणारा जिना मात्र .......
आज कुणी कुणाला हक्कानी खाली बोलावेल कां हो ?
आज खरेच खूप काही गमावल्यासारखे वाटते आहे ,
नंदाकाकू , मंजिरीकाकू , माधवीवहिनी,किर्ती, भारती ,सगळ्या बायकांना बाहेर काढायच्या ,
मकवाना आंटी, घुगरे काकू , हर्डीकर वहिनी आडून आडून का होईना पाणी ओतायच्या !
सुशील, अल्ल्या, बाबू, मी , अनिरुद्ध , मंदार सगळ्या काका लोकांना बाहेर काढायचो,
फक्त टिळा टिळा म्हणत बादल्या उलट्या करायचो , आता काकांवर हक्क गाजवावा असे काका उरले आहेत कां हो ?
आज खरेच खूप काही गमावल्यासारखे वाटते आहे ,
बराच वेळ झाला की राधा सदन मधून आपल्यावर आणि इकडून त्यांच्यावर मारा व्हायचा ,
आज मया , निनाद , राजेश , रत्ना , मिनारदादा बाहेर तरी पडतील कां हो ?
सगळे रंग अन् पाणी संपल्यावर पंडितच्या बाजूच्या त्या जुनाट पिम्पातली माती फेकायचो ,
आज स्वामी नारायण मध्ये येणाऱ्या लोकांच्या शिव्या खायला कुणी तयार आहे कां हो ?
आज खरेच खूप काही गमावल्यासारखे वाटते आहे ,
कालच गुरुकृपेतल्या अरुंधतीचा मेल आला की आता आमची सद्दी संपली तरी ओंकारची टीम जोरात आहे ,
पण प्रश्न एकच आहे ??? नवे लोक जुन्या रितीत मिसळून घ्यायला तयार आहेत कां हो ?
ओंकार, निहार, रितेश, आदित्य सगळे खूप काही सगळे छान पार पडतील खात्री आहे मला ,
पण परत अजून एक प्रश्न आहेच? सगळे तसेच नीट पद्धतीने करतील नां ? गालबोट तर लागणार नाही नां ???
आज खरेच खूप काही गमावल्यासारखे वाटते आहे ,
नवे सगळे झाले आहे , जुना सूर कुठेतरी हरवला आहे
आज खरेच खूप काही गमावल्यासारखे वाटते आहे ,
गेलेल्यांची फ्रेम मनावर मणभर ओझे ठेवते आहे !!!
आज खरेच खूप काही गमावल्यासारखे वाटते आहे ,
सचिन बेस्टच आहे पण गावस्करला विसरता येत नाही ,
स्पिन कुणीही टाकेल पण बंडा सारखा कुणाचा बॉल वळणार नाही
परत एकदा नयनीश ,मी, मया, बाबू खेळायला उतरू पण ...............
सुशील , रत्ना , मिनार चे बॉल चे छ्प्पे पाठी पोटावर घेऊन घरी कुणी जाणार नाही !
आज खरेच खूप काही गमावल्यासारखे वाटते आहे ,
आजच्या केसरबागेला बोक्याचा सलाम
आमच्या त्या वाडीला कायमचा अलविदा !
गांधीशी परत KUM ची मीटिंग होईलही
गांधी म्हणजे काय ते सांगायला कुणीही उतरणार नाय .......
आज खरेच खूप काही गमावल्यासारखे वाटते आहे ,
विली, बिपीन नंदू आणि आनंद काका आता हातात oil paint घेऊन असणार नाहीत ,
घरी अंग साफ करायला & शिव्या घालायला रॉकेलच्या बाटलीसोबत आई वाट पहाणार नाय !
मी आता मागच्या डायर्या फाडायला सुरुवात केली आहे ,
नवी विटी नवे राज्य , कुणीतरी नवी डायरी लिहायला सुरुवात करायला पायजे हाय !
प्र......साद जोशी .
Monday, February 22, 2010
सुकल्या अश्रुंचे ते प्राजक्त होते !
जीवघेणी दररोज येते
मग सरता सरता रात्र ही उरते ,
पहाटेची रोज वाट पाहते !
सतत असतो तुझाच वावर ,
मनातील सर्व मनातच रहाते
मग खांबामागुन लपून पहाते ,
उन्हे रोजची किलबिल न्हाते !
मी तर वेडा या तीरावर ,
पारावर ती बसून रडते
लांब सावली पडते जेव्हा
अश्रुपुरात ती नदी थांबते !
वहात जातो पैलतीरावर ,
गात्रागात्रातुनी रक्तही थिजते
मागमूस ना काही उरतो
मम श्वासांचे बंधन संपते !
शेवट उरतो एकच काहूर
नदीला मग येतो गहिवर
नेते मजला मातीसंगत
ध्यान, समाधी, थडगे उरते !
जाणे येणे रोजचेच ते ,
वहिवाट ही रोजचीच ती
लिंपण होते थडग्यावरी
सुकल्या अश्रुंचे ते प्राजक्त होते !
प्र.....साद जोशी.
२२.०२.२०१०
पुणे
Sunday, February 21, 2010
तसे आता सगळेच बदलले आहे !
तसे आता सगळेच बदलले आहे,
मन मात्र काहीच मानत नाहीये ,
गुडघ्यापर्यंत पाण्यातून पाऊस पडताना
गटाराच्या पाण्यातून केसरबागेची सुरुवात होते कां हो ?
तसे आता सगळेच बदलले आहे,
कुणाला ती कचरापेटीच्या केबिन आठवत आहे कां ?
केबिन उचलून नेली असेल तरी
आतल्या आठवणी मनातून जाताहेत कां हो ?
तसे आता सगळेच बदलले आहे,
इंदिरा स्मृती आणि अमृतानुभव कुणाला आठवेल कां ?
बिल्डींग काही दिवसात पडली आणि तिथले मोकळे ग्राउंड काही काळासाठी परत आले
दारातून आत येताना येणारा चाफ्याचा आणि बुचाच्या फुलांचा वास दरवळतो आहेच नां ?
तसे आता सगळेच बदलले आहे,
अजूनही लांब रन अप घेऊन कुणी बोलिंग टाकते कां हो ?
काचा फुटल्यावर वाला मधून कुणी भरून आणून देते कां ?
रस्ते कितीही बनवले तरीही राधा सदन समोरील बुजलेले स्टंपची भोके मनात तशीच आहेत नां ?
तसे आता सगळेच बदलले आहे,
अख्खी गुरुकृपा देवधर आणि मटंगे यांचे भांडण मिस करत असेल नां ?
श्रीनिवास म्हणे आता मोठ्ठी बिल्डींग होणार मग त्यावरून बॉल जाणार कसा ?
सगळेच कॉम्पुटर वर बसल्यावर क्रिकेट कुणी तरी खेळत असेल कां हो ?
तसे आता सगळेच बदलले आहे,
कुणाला आठवेल २४ डिसेंबरचा फन फेअर आणि बाबूचा वाढदिवस आठवेल कां ?
गणपतीच्या आदल्या रात्री सुशीलदादा स्टेशन वर नेवून चहा कुणाला पाजेल हो ?
रात्रभर कॅरम खेळत कुणी गणपतीशी कुणी जगायला तयार तरी असेल कां ?
तसे आता सगळेच बदलले आहे,
मान्य आहे मला बदल ही प्रगतीची पाऊलवाट आहे
केसरबाग कधी वाडी होती , तिची कॉलोनी कधी झाली ?
कुणाला कधी वाडीची आपुलकी कॉलोनी मध्ये मिळेल कां हो ?
तसे आता सगळेच बदलले आहे,
ए काकू , ओ काका कधी अंकल आणि आंटी झाले समजलेच नसेल
शिट्टी वाजवून बोलावणे गेले आता अन् मोबाईलचा एक रिंग देणे उरले
आयला , च्यायला फार दूर गेले त्यातलाही आपलेपणा आता कुठे सापडेल कां हो ?
तसे आता सगळेच बदलले आहे,
मी मात्र अजून तसाच वेडा आहे , केसरबागेत बॉक्स क्रिकेट शोधतोय
बाबू, शाम्प्या ,बापंडी, मुन्नाला खेळायला हाक मारत फिरतोय उगीच
भरून द्यायला खिशात पैसे पण आहेत , फुटायला काचा कुठे आहेत हो ?
पण
तसे आता सगळेच बदलले आहे,
बंडू विकेट कीपिंग करायला आहे कुठे ?
सुऱ्या, रवी, फील आणि जग्गू बोलिंग करायला आहेत कुठे ?
मी पण आहे , ते पण सगळे आहेत ........................
केसरबागेचे केसरबागपण हरवले आहे कुणाला कुठे सापडेल कां हो ?
ए मंदार , ए समीर , ए मोहित , ए मया
सगळ्यांना हाका मारून झाल्या ,
जोरात लांबून एक हाक आली
ए बोक्या ................
आता केसरबाग तुझी नाही राहिली रे बाबा ...आता सगळेच बदलले आहे,
तसे आता सगळेच बदलले आहे,
तसे आता सगळेच बदलले आहे,
खरेच मी आता नाही राहिलो तिथला .....
माणसे तीच आहेत पण आपलेपण ?
जागाही तश्याच आहेत तिथल्या
पण .........आता सगळेच बदलले आहे !!!
तसे आता सगळेच बदलले आहे,
प्र.......साद जोशी.
पुणे ??? मुलुंड ???
Sunday, January 31, 2010
समजलेच नाही जगणे सुंदर आहे
जीव माझा शिणला होता !
हेलकावत असाच वहात होतो
जीव माझा शिणला होता !
मेंदूपर्यंत वाळू शिरली होती
जीव माझा शिणला होता !
नाकातोंडातून पाणी गेले
जीव माझा शिणला होता !
कुठून जीवलगाचा हात आला
जीव माझा शिणला होता !
किनाऱ्यावर पडून होतो
जीव माझा शिणला होता !
भणंग मी , मग हात कां आला ?
जीव तर माझा शिणला होता !
तिनेच केले बोलते मला जरी
जीव माझा शिणला होता !
तरी न् जमले बोलणे मला
जीव माझा शिणला होता !
मुक्त केले बंधानातुनी तिनेच मला
श्वासांवर बांध तिने घातला होता !
आठव नाही जीव शिणल्याचा
तिच्याच हाती जीव सोपवला आहे
याद नाही अता माझी मलाही
कधी जीव माझा शिणला होता !
कधी कुंचला तर कधी बोलणे
जगणे अता उमगले आहे
इतुकेच अता उमगले मला
सरता काळ मागे पडला होता !
कोण जाणे कधी हे घडले
जीवही आता गुंतला आहे
सरणावरुनी परतुनी आलो
अता जगण्याकरिता हात हाती होता !
नाही उमगत कां इतका काळ
समजलेच नाही जगणे सुंदर आहे
खरेच कां मी तोच होतो ?
ज्याचा जीव शिणला होता ?
प्र...........साद जोशी
पुणे
०१.०२.२०१०