मी देवाशप्पथ सांगतो की मी सकाळी सकाळी गुड मॉर्निंग ची फुलं; त्यांचे गुच्छ; काहीवेळा तर व्हिडीओ सुद्धा येत असतात पण मी त्यातलं तुला काहीही फाॅरवर्ड करणार नाही.
आणि हो दुपारी पाठवायच्या व्हेज आणि नाॅन व्हेज थाळ्यांचे फोटो, व्हिडीओ त्याचबरोबर
उपवासाच्या पदार्थांची मांदियाळी मी कालच माझ्या स्टोरेजमधून कायमची डिलीट केली आहे.
त्यामुळे त्याचेही भय नको
मनस्ताप देणारे / प्रबोधन करणारे /शिक्षणाचा आव आणणारे तर मी स्वतःच कधी खपवून घेतले नाहीत त्यामुळे ते तुला पाठवण्याचा उद्योग होणारच नाही ...
एकंदरीत काय तर मी तुला मनापासून तसदी देणार नाही.
या सर्वाचा विचार करता तुला वाटलं तर माझे दोन्ही नंबर तुला पाठवत आहे.
वाटलं तर कर स्टोअर
नाहीतर जाऊदे कारण ...
✨✨✨ कशी आहेस गं ? एवढं विचारण्यासाठी मी मेसेज करण्याऐवजी फोन करेन किंवा माझ्या दोन्ही नंबरच्या पॅकेजनुसार मला वेगळा एकही पैसा न लागणारा खर्र्रर्राखुर्र्र्रा टेक्स्ट पाठवेन ...
कुठलंही नातं असो किंवा नसो; त्यांच्यात वयाचं अंतर असो किंवा नसो ..
या अथवा त्या दोन / तीन व्यक्तींचं संभाषण रोज घडो किंवा वर्षावर्षांनी ... कायमचं आणि मनापासून येणारं असलंच तर अपेक्षित पहिलं वाक्य किंवा त्याचा सरळसोट अर्थ एकच असतो
"कसे आहात ? सगळं सुरळीत आहे नां?"
उत्तर काय यावं हे विचारणारा ठरवत नाही पण ...
समोरच्याला त्यातला खरेपणा / खोटेपणा नक्कीच समजतो आणि मग संभाषणाची दिशा ठरते वा खुंटते ...
समजण्याची कुवत असणारा न आलेलं उत्तर देखील समजून घेतो आणि कधी "नंतर बोलूया?" यापैकी दोन शब्द आणि एक प्रश्नचिन्ह सुध्दा समजून घेतो ...
नातं असो वा ओळख ती रुजायला अन् जुळायला संभाषणाची लांबी रुंदीचे माप लागत नाही ... त्याला कधी एक टाळी किंवा एखादी पाठीवरची थाप पुरेशी असते ...
हो एक मात्र नक्की की ओळखीचं लेबल आपसूक पडून नातं जुळायला
आणि मग कधी सगळीच लेबलं राहतात आणि "गुड मॉर्निंग" च्या पलीकडे काहीच उरत नाही
आणि कधी
असं होतं की
१९७० साली मुंबईत कुठेतरी जन्मलेला अमुकअमुक १९७५ किंवा १९७६ जन्मलेला पारगावकरांच्या आणि सोनावणे घरातून जन्मलेल्या देहांचा मित्र होतो आणि मैत्र जीवाचे व जीवाभावाचे कधी कसे होतात समजत देखील नाही ...
शेवटी कळीचा मुद्दा काय तर वाहतूक व्हायची असेल तर ती दोन्ही बाजूंनी होते ...
एकाच बाजूने सुरु राहणाऱ्या रहदारीला कुठे नां कुठे "नो एंट्री" चा बोर्ड लागतोच ...
©रचयिता
प्रसाद रमाकांत जोशी
No comments:
Post a Comment