चोचौचंचः जे मनात उमटतं ते तसं तसंच्या तसंच

Sunday, September 20, 2015

*** इतरांच्या आनंदापेक्षा इतरांना मिळणार्‍या त्रासात सगळेच आनंदी असतात ***

वैतागून ती म्हणाली
*** इतरांच्या आनंदापेक्षा इतरांना मिळणार्‍या त्रासात सगळेच आनंदी असतात *** अरे किमान आजतरी या लोकांनी काम काढायला नको होतं ...
मी चेहर्‍यावर बुचकळ्यात पडलो आहे हे दाखवायचं नाही म्हणून मोघम पुटपुटलो
कां ? काय झालं एकदम ?

हम्म ... तुला सगळ्या गोष्टी समजावून सांगायला लागतात रे

या वाक्यासरशी माझा चेहरा प्रयत्नपूर्वक बुचकळ्यात पडला आहे हे दाखवण्यात मी यशस्वी झालो.

आज वार आहे शनिवार; शेजारच्या घरातून येणारा आवाज , त्या आवाजामागच्या या हातोड्या आणि ते घण ... काहीच ऐकू येत नाहीये कां ?

हो गं ...
पण नक्की शेजारच्या फ्लॅटमधून येतोय की वरच्या मजल्यावरून ?

कठीण आहेस तू ..  अरे वरच्या मजल्यावर दोन्ही घरात भाडेकरू रहातात त्यामुळे हा येणारा आवाज

हम्म्म  ... बरोबर आहे तुझा तर्क

तर्क काय ? हा काॅमन सेन्स आहे रे

(मौन)

आता असाच बसणार आहेस की त्यांना विचारणार आहेस ?

काय विचारु मी त्यांना ?

अरे सोपं आहे  ... आत्ता कसं काय काम काढलंत ? मागच्याच वर्षी तर सबंध घराचं रिनोवेशन केलं होतं नां तुम्ही असं बोलून सुरुवात कर , पुढे ते आपसूकच स्वतःहून सांगतील.

जिथं जसा होतो तिथूनच मी १८०° तून ९०° आणि तसाच साडेबारा झालो आणि चालत पहिल्यांदा मेन डोअर उघडलं; कुणी दिसतंय कां याचा अंदाज घेत सेफ्टी डोअर उघडलं ...
दारावर असलेला सेफ्टीचा डोळा भिंतीला चिकटला आणि आतला रडार सुरु झाला

मी डोकावलो तर बाजूच्यांच्या घरातूनच तोडफोडीचे आवाज आले.
मी विचारात पडणार इतक्यात रडारातून सूचनात्मक कारवाईचे संदेश आले. गपगुमान शेजारांच्या सताड उघड्या दारासमोर उभा राहून मी आतल्या कामगारांचे लक्ष वेधण्यासाठी निरनिराळे आवाज काढू लागलो

माझ्या घरातील रडारातून आवाज आला "त्यांचा आवाज सुसह्य आहे यापेक्षा"

एवढ्यात आतला मेहरबान झाला आणि अख्ख्या सोसायटीत माझाच आवाज घुमला "ए बाबा ! ऐकतो कां जरा?"
मग चौकशीपुराण सुरु केलं ; त्यात असं समजलं की शेजारचे घरीच नाहीयेत ... कामाचा आवाज होतो म्हणून ते दोनतीन दिवसांसाठी कुठंतरी आऊटिंगला गेलेत.

बाकीचं सोड ... किती दिवस आपल्या भिंतीच्या बाजूचं काम चालणार आहे हे विचार आणि दार बंद करून आत ये ...

सूचनेचा आदर राखत मी पण नेमकं विचारलं

"आमच्या बाजूच्या भिंतीचं आणि त्यालगतच्या टाईल्सचं फोडकाम तासाभरात उरकणार होतं आणि नव्या टाईल्स बसवणं सुरु होणार होतं"

हे ऐकल्यावर दुष्काळसंबंधी उपाययोजना या विषयावर सुरु असलेल्या कृषी किंवा वेधशाळेच्या लोकांच्या विशेष सूचनांचा कार्यक्रम सुरु असताना जसं अचानक एका हिंदी चित्रपट सम्राज्ञीच्या कुत्र्याला दिल्या जाणार्‍या उपाययोजनेची ब्रेकींग न्यूज आल्यावर जे काही होतं तसं माझं तिकडचं प्रक्षेपण बंद करून प्रमुख संचालकांनी सूत्रं हातात घेतली.

मी पण हेच हवं होतं असं दाखवत आत आलो आणि सोशल नेटवर्किंग साईटवर माझं बहुमूल्य मतप्रदर्शन सुरु केलं

आधी एक काॅमेंट, मग हिरिरीने केलेली चर्चा यातून माझी एक स्वतःची पोस्ट तयार झाली ....
त्या पोस्टला बावन्न लाईक्स व सोळा काॅमेंट्स मिळाल्या ...
किमान दोन प्रस्थापित; प्रतिथयश लोकांनी माझ्याशी वैयक्तिक खिडकीतून संपर्क साधला... हे कमीच म्हणून साडेचार जणांनी व्यक्तीशः दूरध्वनीवर बोलणंही केलं (एकाचा काॅल सुरु असताना दुसऱ्याचा काॅल येऊन गेला म्हणून एक अर्धा)

या सगळ्याने भारावून गेलेल्या मी घरातल्या रडाराचा अंदाज घेतला तेव्हा ऐकू आलं ...

"आम्ही नशीबवान आहोत अगं ... आमच्या बाजूचं काम जवळपास झाल्यातच जमा आहे पण आता उरलेला आजचा दिवस आणि उद्याचा पूर्ण रविवार त्या बाजूच्या बाथरुम आणि टाॅयलेटचं फक्त फोडाफोडीचं काम आहे"

मला काही उमगायच्या आत एकच वाक्य ऐकू आलं
"त्या ××××× च्या घरच्या गौरीच्या जेवणाला मस्त बॅकग्राऊंड म्युझिक असणार आहे"

*** इतरांच्या आनंदापेक्षा इतरांना मिळणार्‍या त्रासात सगळेच आनंदी असतात ***
मग तो बाजूच्यांच्या घरातूनच येणारा तोडफोडीचा आवाज असो की माझ्या पोस्टसमोर नेस्तनाबूत झालेल्या त्या "सोशल नेटवर्किंग साईटवरच्या प्रतिथयश लेखकाला मिळालेला कभी प्रतिसाद असो"
आपला आनंद समोरच्याच्या दुःखात लपलेला असतो हेच खरं !!!

No comments:

Post a Comment