चोचौचंचः जे मनात उमटतं ते तसं तसंच्या तसंच

Monday, February 3, 2014

समज असतो समाज नावाचा ...

समज असतो समाज नावाचा ...


संवेदना एकट्याची असली नां की बरं होतं
ती वेदना म्हणा किंवा संवेदना म्हणा
तिचं टोचणं तिचं बोचणं
हे जसं असेल ते कसं असेल ते सर्वच्या सर्व  खूप वैयक्तिक राहतं
(हेच खरंतर बरं असतं असं खूप काळानंतर समजतं ज्याचं त्याला जेव्हा समजून घेण्याची तयारी झाली की आणि वेळ नेमकी सरुन गेली की मगच)
बोलण्यानं मन हलकंबिलकं होतं म्हणे
उगाच चोचले साले मनबिन नावाच्या बिन अस्तित्वाच्या एका आभासी कल्पनेचा अजून एक आविष्कार ...
आपलेच आपण पुरवत बसायचं असतं खरं तर पण तसं केलं तर आपण आपली कुटुंबाची व्याख्या बदलेल बिदलेल की काय याची फुका काळजी वाहतो जो तो
आणि चूक झालेली असतेच तिच्यावर हळदीच्या ऐवजी मीठाचा मारा सुरु करतो ...
काय सांगू कां दोस्तहो ?
आपलं आपणच जखम कुरवाळण्याचा कंटाळा आला नां की ...
कुणीतरी लागतं कधी हळदवालं, कुणी मीठवालं कुणी पट्टी बांधणारं
कुणी उगाच उभं राहतं
खरं तर ते बघे असतात नां ? त्यातलं प्रत्येक जण आपल्या जखमेची आणि दिसत्या जखमेची तुलना करुन बघतात, बघत बसतात आणि
प्रत्येक जण आपल्या पद्धतीनं एकच वाक्य उच्चारतं आणि आल्यागेल्या वाटेवर निघून जातं
" हे नां ? हे तर काहीच नाही राव !!! "
अजून एक सांगतो जाताजाता
आपापल्या जखमेला कुरवाळून झालं की बरं वाटतं मग कितीही कित्येकांनी मलमपट्टी केली असली तरी ...

No comments:

Post a Comment