चोचौचंचः जे मनात उमटतं ते तसं तसंच्या तसंच

Thursday, November 7, 2013

इकडचे आणि तिकडून इकडचे नाका / कट्टा किंवा चौक

कुठल्याही शहराचा एखादा चेहरा बघायचा म्हणजे नेमकी काही ठिकाणं आहेत जिथंअंदाजे दोन ते तीन तास किंवा फारतर एखाद दिवस घालवायला लागतात आणि या कालावधीतआपल्याला त्या शहराचा किंवा स्थळाचा एक प्रार्थमिक अंदाज येतो, सहसा यासुरुवातीच्या अंदाजाच्या पाचदहा टक्के इकडेतिकडे सोडलं तर अंदाज चुकत नाही अर्थातहे माझं निरीक्षण आहे आणि मी स्वतः परीक्षण समीक्षण करण्यापेक्षा निरीक्षणकरण्यावर भर देतो कारण निरीक्षणात बदल करणे अत्यंत सोप्पे असतं ते परीक्षण किंवासमीक्षणात शक्य नसते.
या परीक्षेत सगळ्यात सोप्पं ठिकाण म्हणजे त्या ठिकाणाचा एखादा तरुणाईचा (तरुणाईचासरळसरळ अर्थ वय असा घेऊ नये इथं मनाची अवस्था अपेक्षित आहे म्हणजे जी त्या तिथल्यालोकांच्यात आपल्याला दिसते ती किंवा आपल्याला दिसते म्हणण्यापेक्षा भावते तीतरुणाई मला अपेक्षित आहे) एखादा नाका किंवा चौक अथवा कट्टा आपल्याला सहज मदत करतो.इथे व्यक्त होणारी सगळी मतं हे अत्यंत वैयक्तिक असतात आणि अगदी प्रभाव असलाच तर तोतिथल्याच कुठल्याश्या एका दृष्टिकोनाचा असतो यापलीकडे कुणाचाही किंवा कुठल्याही(अ)राजकीय तत्वांचा या मतांवर प्रभाव नसतो सहसा.
मी ज्या शहरात मुख्यत्वे वास्तव्य केलं त्यापैकी एक म्हणजे मुंबई आणि मुंबईचानाका याबाबत सांगायचे तर नाका ही एक संस्कृती वगैरे नाहीये अजिबात कारण घरातल्याजागेच्या व्यस्त प्रमाणात असलेल्या लोकसंख्येमुळे मत प्रदर्शित करण्याचे हमखासठिकाण म्हणजे नाका आणि सोबतीनं घरात चालत नाहीत अशी कृत्ये आणि भाषा या दोन्हींचासढळ हस्ते (मुखे) वापर करता येतो ती जागा म्हणजे नाका.
सरकारने कितीही प्रौढ शिक्षणाचे कार्यक्रम राबवले तरी आणि तरीही नाक्यावर जी काहीशिक्षणपद्धती राबवली जाते याला तोड नाही कारण इथं येवून सख्खे नातेवाईक देखील फक्तआणि फक्त नाक्यावरचे सोबती असते आणि यामुळे मतप्रदर्शन खूप सुलभ होते ज्यामुळेआपापल्या दृष्टीने असेलेली आवड (निवड) ही सहजपणे घराच्या उंबऱ्यापर्यंत पोचवतायेते. एखाद्या व्यक्तीला आपण लहान समजत असणे या मताबद्दल एखाद्या क्षणी अलगत सदरव्यक्ती मोठी झाली आहे अश्या मतपरिवर्तनात नाका फार मोठी मोलाची कामगिरी पारपाडतो. तसंच घरातल्या अनेक लोकांना आपला पिंट्या किंवा आपली छकुली सध्या नेमक्याकाय विचारप्रवाहात आहे याचे नेमके ठोकताळे इथं आणि फक्त इथंच ध्यानात येऊ शकतात.
अर्थात एखाद्या शक्यतेत विचारांना लागणारे अनाठायी वळण किंवा गैरसमजूतसुध्दा इथंचदूर करता येऊ शकते आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे संस्कार नामक भ्रामक कल्पना जरकुणी उराशी बाळगून आपल्या स्वतःच्या घरात हुकुमशाही करत असेल तर त्या त्याव्यक्तींना आपापल्या घरातल्या होऊ शकणाऱ्या किंवा होऊ घातलेल्या बंडाची आगाऊसुचनादेखील इथंच नेमकेपणे कळू शकते
मुंबईच्या नाकावरून खरं तर एखाद्या शब्दकोषात पानं कमी पडतील इतक्या मुबलकप्रमाणात शब्दसंचय मिळू शकतो आणि त्याहूनही जास्त प्रमाणात लिखाण होऊ शकतं पण जागामिळाली म्हणून मुबलक पसरापसरी करण्याचा मुंबईचा स्वभाव नाही आणि मलाही तसंचवागायला हवं.


कोकणात नाका अशी निराळी संस्कृती मुळीच नाही किंबहुना कोकणाला तशी आवश्यकताचभासत नाही कारण किमान दोन आणि कमाल कितीही टाळकी जमली की असतील त्या ठिकाणी चर्चा,परिसंवाद किंवा भाषणे झडू शकतात कोकणात.
मुळात कोकणातल्या लोकांबाबत इतर प्रांतातील लोकांना असेलेली असूया हेच मुळीकोकणाबाबत असलेल्या गैरसमजुतीचे मूळ कारण आहे.
निवांतपणे आयुष्य जगता येऊ शकतं ही कोकण सोडून इतरप्रांतीयांना कविकल्पना वाटतअसल्याने ह्या कल्पनेचा आविष्कार झाला असावा असं माझं मत आहे आणि मत मांडण्यासाठीमुंबई पुणे किंवा कोकण यांची मक्तेदारी अजिबात नाही असलीच तर ती दिल्लीत असेलमात्र भारतात दिल्ली नामक एखादा देश असल्याचे समस्त कोकणवासियांचे प्रार्थमिक आणिअंतिम मत आहे.
असो माझ्यातल्या कोकणवासियाला जागृत केल्यागत मी चार अवकाशयाने एकमेकांना जिथंभेटण्याची शक्यता आहे अश्या ठिकाणीसुध्दा कुवत असलेल्या माणसासारखं मला आत्तातरीबोलण्याची गरज अजिबातच नाही कारण एखादा शिगवण आणि एखादा जोशी हे जितक्या त्वेषानेगावात द्वेषाने वार्तालाप करत असतील तेच दोघे मुंबईत एकाच नाक्यावर आपापल्या परीनेकोकण किती गुणवंतांनी भरलेला आहे याबाबत एक होऊन भांडण करताना दिसतील.
तर मूळ विषयाला अजिबात बगल न देता चिकाटीने आहे तोच विषय चघळून चघळून बोलण्याचीजागा म्हणजे कोकणातल्या कुठल्याही गावाचा चौक (पूर्वीच्या सिनेमा वगैरेमधून जरतुम्ही चावडी असं काहीबाही मनात ठेवलं असेल तर आधीच सांगतो कोकणात असं काहीही आढळतनाही. कोकणातल्या कुठल्याही गावात आता कुणीही अनुनासिक वगैरेदेखील बोलत नाही (जरआढळलेच अगदी तर समजा की कुणी पुणेकर कोकणप्रेमापोटी भेट द्यायला आले आहेत) तर मूळविषयाडून न भरकटण्याची हमी म्हणजे कोकणातला चौक.

आजचा डॉलररेट ते कमी स्पीडचा इंटरनेट यापैकी कुठलेही विषय तुम्हाला कोकणातल्या चौकाचौकातदिसू शकतात पण एक नक्की इथं मिळणाऱ्या माहितीच्या आधारावर जर कां तुम्ही कुठलेनिष्कर्ष काढणार असाल तर तसं चुकुनही करू नका कारण दोन फुटाच्या खड्ड्याला कुत्रीमुतण्याची जागा ते गावाचे तळे असं काही म्हणजे काहीही ऐकण्याची तयारी जर असेल तरइथं विश्वास ठेवावा कारण कोकणात ऐकीव आणि बघितलेल्या या दोन्ही गोष्टीत स्त्री तेपुरुष इतकी तफावत आढळू शकते.
पण एका खरं चौकाचौकात घडणाऱ्या गमतीजमतीमुळे या कोकणातल्या रोजच्या जीवनात एकवेगळा बहार येतो नाहीतर मला सांगा चार दिवसाआड एकदा येणारे पाणी, पर्यटकांमुळेयेणारा पैसा व त्यासोबत वाढणारा कचरा आणि चोवीस तासात सुर्याहून कमी वेळ टिकणारीशासनाची वीज यामध्ये माणसांनी विरंगुळा शोधायचा तो कुठं ?


कोकण आणि मुंबई यांच्या नाका आणि चौकाबाबत बोलून आणि लिहून झालं पण पुणे येथीलकट्टा आणि टपरीवरच्या गप्पा आणि त्याच्या विश्लेषणासाठी मला वेगळी सवड लागेल आणिते वेगळेपण टिपायला वेगळा मजकूरसुध्दा कारण पुणेरी कट्टा याबाबत लिहायचे म्हणजे निराळेपणसिध्द करण्यासाठी निराळेपण हवे, आता इथं तसदीखेरीज काहीही द्या असं सांगणारे मैत्रआहेत त्यांच्यासाठी वेगळे लिहिणेच रास्त ठरेल.

क्रमशः

Friday, October 4, 2013

असंच एका आभासी जगातल्या पण सच्च्या दादूसाठी

"कागदावर शब्द आहे की सुरी
शाई असो वा असो ते रक्त
स्वेच्छेने गळा खाटकाच्या हाती
मुक्तता मिळे पण तीही अव्यक्त"

Friday, September 27, 2013

“ होय महाराजा “ असा कौल मागतोय



गजाल खरी काय ? व्हय महाराजा !
दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी, विकास कदम, ज्योती मालशे, सुहास शिरसाट, किशोरी शहाणे, अतुल परचुरे, निखील रत्नपारखी, भाऊ कदम, कमलाकर सातपुते, कमलेश, शशिकांत केरकर आणि (अनेक या शब्दात जे जे आहेत त्यांनी स्वतःला समजून घ्यावं कारण कुणाचाही उल्लेख करू नये असं नाही) किती नावं घेऊ ? कारण ज्या ज्या कलाकारांची नावं घेतोय तिथं या नावांपाशी नारबाची वाडीच्या वेस लागते फक्त अख्खी वाडी पालथी घालायची असेल तर निर्माते गुहा यांच्यासोबत इथं या वाडीच्या गडग्यापाशी यावे लागेल , गडग्याच्या दगडादगडात आणि कुपणीच्या फिरवलेल्या सुंभाच्या पिळात प्रत्येक कलाकाराने दिलेलं योगदान आहे आणि ते दर्शन झालं की मग अदित्य सरपोतदारच्या सोबतीनं वाडीतल्या प्रत्येक ठिकाणाची आणि त्यातल्या सजीव आणि निर्जीव (???यातल्या निर्जीव गोष्टीदेखील काही नां काही बोलतात राव) गोष्टींची ओळख करून घ्यावी लागेल...
कारण या वाडीला आपण नवे असू असं आपल्याला वाटेल पण एकदा आत आलो की तिथल्या प्रत्येक घटनेचे साक्षीदार कधी बनतो ते अगदी सिनेमा संपेतो आपल्याला समजत नाही अजिबात आणि बाहेर येताना वाडीला परत यावं याचे समीकरण बांधतच आपण बाहेर येतो.
बंगाली संस्कृती आणि मराठी संस्कृती यात एक विलक्षण साम्य आहे यावर मी बोलणे म्हणजे उगाच आपल्या सगळ्यांचा अनाठायी वेळ खाणं होईल हे खरं असलं तरी मूळ संकल्पना बंगाली आहे त्याला इतका सुरेल आणि सुरेख न्याय गुरु ठाकूर व्यतिरिक्त कुणी देऊ शकलं असतं तर ते स्वतः बासुदा , हृषिदा किंवा गुलजार असावे लागले असते अन्यथा कठीण आहे हे इतकं आणि इतकंच सांगून गुरुचे श्रेय संपणार नाही पण ठायी ठायी गुरु ठाकूर स्पर्श जाणवत राहतो आणि अदित्य एक दिग्दर्शक म्हणून या अनुभवाला उगाच स्वतःची भट्टी जमवण्यासाठी काही त्रास न देता अधिक गडद करतो आणि इथे अगदी इथेच या सिनेमातली प्रत्येक फ्रेम स्वतःची म्हणून वावरते आणि त्यावर कुणाचाही प्रभाव असा न राहता अख्ख्या सिनेमाचा प्रभाव पडतो.
मी परीक्षण किंवा समीक्षण करण्याजोगा मानतच नाही मला कारण माझा मुद्दाच मुळी दाद देणे अथवा गप्प बसणे असा असतो कारण प्रत्येक कलाकृतीला स्वतःचा बाज असतो आणि आपण अनेकदा आपल्याला त्या त्या ठिकाणी स्वतःला ठेवून बघतो आणि ते पटलं तर आपल्याला आवडलं असं म्हणतो आणि नाही पटलं की बेक्कार म्हणून ओरड करतो जे मला पटत नाही आणि म्हणूनच मी कायम निरीक्षण करतो (काल अदित्यशी फेसबुकवर मेसेजमधून हेच मी लिहून कळवले तेव्हा त्याने म्हटले की उत्तम निरीक्षण केले तरच परीक्षण जमते असं त्याचं मत माझ्या कानावर त्यानं घातलं आहे पण त्याच्या बोलण्याकडे मी त्याच्या पुढच्या सिनेमासाठी राखून ठेवतो स्वतःला)
नारबाची वाडी काय आहे असं म्हटलं तर ही एक एक तळकोकणातली साधीसुधी घटना म्हणावी तरी चालेल आणि तसं नाही म्हणायचं असं जर ठरवलं तर एका श्रीमंताने अट्टाहासाने स्वतःचा हट्ट पूर्ण करायच्या नादाला एका तुमच्या आमच्या सारख्या माणसानं आणि त्याच्या सोबतीला असलेल्या सच्चेपणाने दिलेली लुटुपुटुची लढाई म्हणायचं.
मराठीत दोन म्हणी आहेत नां की हातचं सोडून पळत्याच्या पाठी लागू नये / अन्यथा तेलही गेलं आणि तूपही गेलं हाती राहिलं धुपाटणे या दोन्ही म्हणींचा प्रत्यक्ष साक्षात्कार म्हणजे आहे नारबाची वाडी.
ही अख्खी कथा तीन कालखंडात घडते असं मानलं तरी मूळ आकृतिबंध इतका ठाशीव आहे की कथा स्वतःचा वेग सोडत नाही किंवा आपल्यालाही त्या वेगापासून वेगळं होऊ देत नाहीत ही कमाल इथं दिग्दर्शक म्हणून अदित्य सरपोतदार आणि पटकथा / संवाद कर्ता गुरु ठाकूर यांची आहे.
अख्ख्या गावावर जवळजवळ स्वामित्व असलेला खोत एका हव्यासापायी आपली संपत्ती आणि जीव कसा गमावून बसतो आणि त्याच्या या प्रयत्नाला अत्यंत सहजतेने आणि आपल्या परीने आडकाठी करणारे आजोबा इतकीच कथा खरं तर पण एकटे आजोबा कुठंही सुपरहीरो असल्याचा आव आणत नाहीत किंवा तसं चुकुनही प्रेक्षक म्हणून आपल्याला जाणवत नाही. माणूस एखाद्या प्रसंगात सरधोपटपणे कसा वागेल तसंच अगदी तसंच वागणं दाखवलं गेलं आहे आणि इथंच या सिनेमाचे वेगळेपण आहे.
अत्यंत साधंसोप्पं असलेलं तसच्या तसं पडद्यावर आणणंच खूप मोठ्या ताकदीचे आहे आणि हे सर्वांनी पेललं आहे अगदी समर्थपणे.
एका सरळ मार्गाने सांगायचं तर सिनेमा सुरु होतो तोच मुळी सिनेमाच्या दोनपैकी एका गाण्यावर सिनेमाची टायटल्स येतात तेव्हा आणि नेमका याच क्षणी आपण या सिनेमाच्या प्रेमात पडतो, पूर्वी लक्ष्या आणि अशोक सराफ जोडगोळीचे सिनेमे चालायचे तेव्हा एक कार्टून स्वरूपातल्या टायटल्सची क्रेझ आली होती नंतर त्याचा आणि त्या प्रकारच्या सिनेमाचा इतका बाजार वाढला की दोन्हीवर लोकांनी सपशेल बहिष्कारच घातला पण नारबाची वाडी ची टायटल्स येतातच ती मुळी सुखद धक्के घेऊन, क्षणभर आपल्याला आपण आलोय तिथं चुकून मालगुडी डेस किंवा आर के लक्ष्मण याच्या मालिकेची नामावली दाखवताहेत की काय असा भास होतो पण मग प्रत्येक फ्रेमला सजवलेल्या रुपात आपल्याला आपले दिलीपकाका, मनोज जोशी , अतुल परचुरे , निखील रत्नपारखी दिसायला लागतात आणि आपण आपोआप गुणगुणायला लागतो गजाल खरी काय ?
मनोज जोशीने केलेल्या थोरल्या (रंगेल) आणि त्याच्या मुलाच्या या खोताच्या केलेल्या दोन्ही भूमिका व त्यातले कंगोरे, दोन्हींना वेगळं करणारी देहबोली आणि आवाज इतका नेमका वठवला आहे की आजवरच्या कुणाच्याही दुहेरी भुमिकेचा उल्लेख जर कां मराठीत करणार असेल तर न चुकता न विसरता ही भुमिका पहिल्या तिघात असेल यात मला शंका नाही.
दिलीप प्रभावळकर यांच्याबाबत मी काही लिहिणं किंवा बोलणं म्हणजे रोज मुलुंडला सकाळी ब्रिजखाली उभ्या राहणाऱ्या आणि काम मिळवणाऱ्या कढीयाच्या हाताखालच्या बेगारयाने ताजमहाल असा बनवला असावा या विषयावर बोलण्यासारखे आहे त्यामुळे मला ते मान्यच नाही. एकच सांगेन मित्रांनो की कोकणातला म्हातारा असं म्हटल्यावर आपल्यातल्या निम्म्याहून अधिक लोकांच्या डोक्यात अंतू बर्वा तरी येतो किंवा एखादा पिचलेला गडी पण दिलीपकाकांचे पात्र हा एक सर्वसामान्य कोकणातला माणूस असला तरी त्याच्या विचारांना अध्यात्माची बैठक आहे आणि ही बैठक इतकी गाढ आहे की हा कोकणातला सरळ (??? कोकणातला आणि सरळ असं प्रश्नचिह्न तुमच्या चेहऱ्यावर पडलं असेल तरी मी सांगतोय ते शंभर टक्के खरं आहे की हा आज्या मनपासून देवभोळा आणि स्वतः चांगले केले की चांगले फळ मिळते या तत्वावर जगणारा आहे) माणूस गावच्या खोताच्या कुठल्याश्या आधीच्या पिढीतल्या माणसाचे प्राण वाचवले म्हणून ही जागा खोताने बक्षीस म्हणून दिल्याची जाण असतानाच त्यासोबत त्या जागेचा कागद असल्याची व्यावहारिक आणि हिशोबी वृत्तीसुद्धा आहे त्याकडे. ती जागा आपल्या वाडवडिलार्जीत नसली तरी आपल्या श्रमांनी आणि मेहनतीने ही जमीन सुपीक केल्याचा सार्थ अभिमान असतानाच त्याला आपण श्रम केले की ही जागा आपल्याला जगण्यासाठी आणि जगवण्यापुरते देते हे त्याला नेमकं ठाऊक आहे आणि म्हणूनच तो या वाडीला आपली वाडी जेव्हा जेव्हा संबोधतो तेव्हा तेव्हा माऊली म्हणून उल्लेख करतो. या अश्या वृत्तीने आलेलं शहाणपण आणि समज यासोबत आपल्या लेकीच्या मुलाचा सांभाळ करताना त्याला काय हवं नको ते पहाताना त्यानं आपल्याप्रमाणेच या जागेवर जीव लावावा इतकाच कुठेही न बोलून दाखवलेला हट्टदेखील दिलीप प्रभावळकर अत्यंत नेमक्या शैलीत सादर करतात.
थोडासा विषयावरून भरकटतो पण आत्ता हे गरजेचे आहे म्हणूनच
मध्यंतरी अनुमती नावाचा एक सुंदर चित्रपट पाहण्यात आला (सुंदर हे विशेषण विक्रम गोखले या नावाशी सुरु होतं आणि तिथंच संपतं) त्यात श्रीवर्धनचा उल्लेख आणि काही दृश्य आहेत. या गावात किशोर कदम एक गावकरी आणि विक्रम गोखले यांचा शेजारी दाखवला आहे. किशोर कदम यांच्यासारखा एक ताकदीचा नट पाट्या टाकल्याप्रमाणे जेव्हा कोकणी हेल काढून बोलतो तेव्हा हसावं कां रडावं टच कळत नाही कारण कोकणात जिल्ह्यातील भागांनुसार बोलीभाषा बदलते पण म्हणून तळकोकणातली मालवणी भाषा श्रीवर्धनच्या माणसाच्या तोंडी कशी काय आली ? बरं लिहित्या माणसाला कोकणी म्हटल्यावर या प्रकारचे संवाद ठाऊक असावेत पण लिहित्याला नाही समजले ते बोलत्या आणि बघत्या लोकांनाही समजू नये हा घोळ ?
आता तुम्ही म्हणाल प्रसाद अरे नारबाच्या वाडीत अनुमतीला कशाला आणलेस ?
देतोय त्याचेच स्पष्टीकरण देतोय ...
दिलीप प्रभावळकर हे जरी खालच्या अशिक्षित दाखवले असले तरी त्यांच्यावर आध्यात्मिक संस्कार आहेत हे मी जेव्हा सांगितलं तेव्हाच या नारो, नारबा किंवा आज्याच्या तोंडी वेळेनुरूप संवाद येतात आणि त्याचमुळे पटकथा किती जोरकस असावी याचा प्रत्यय गुरु देतो आणि हे असं आहे आणि कां आहे याचा विचार निर्मात्यांपासून नटांपर्यंत सतत सांभाळून नेणाऱ्या दिग्दर्शक म्हणून अदित्य सरपोतदार याचे कौतुक करावे तितके थोडे आहे. सिनेमाला पुरस्कार मिळाला किंवा किती पटकन पूर्ण झाला यावरचे गैरसमज जितके दूर होतील तितकं बरं आहे मराठी सिनेमासाठी कारण या प्रकारात एखादा चांगला विषय किंवा चांगली कलाकृती प्रेक्षकांच्या नजरेस पडायच्या आत नाहीशी होण्याची भीती वाटते.
किशोरी शहाणे हिच्याकडून जसा अभिनय अभिप्रेत आहे तेवढाच आवश्यक असल्याने तिने मनोज जोशीच्या बायकोची (मठ्ठ) भूमिका उत्कृष्ट साकारली आहे (इथं भूमिका आणि अभिनय यापैकी भूमिका या शब्दाला मठ्ठ जोडून घ्यावा अन्यथा विपर्यास होण्याची शक्यता आहे), अंबरीश देशपांडे याने मनोजच्या मुलाच्या अत्यंत छोट्याश्या भूमिकेचे सोने केले आहे, नेमकं प्रत्येकाचा आपापल्या सीननुसार उल्लेख जरी करायचा म्हटलं तर किमान सिनेमाच्या लांबीचे कागद संपतील पण माझं पुरण संपणार नाही. पण ज्योती मालशे हिने साकारलेली मंजू (विकासची जम्मू) ही एका त्याकाळच्या सिनेनटीची हुबेहूब प्रत आहे हे लक्षात आल्यावर अंबरीशने केलेला अभिनय, त्यावेळचे विकास कदमचा फक्त चेहरा, ज्योतीने फेकलेली दोन तीन वाक्य आणि दिलीपकाकांची फक्त बघ्याची भूमिका हा सीन एकाचवेळी अनेक सीन्सना टक्कर देईल असा झाला आहे. खरं सांगायचं तर या टीमचा म्हणजे सगळ्यांचा सांघिक अभिनय बघायचा असेल तर न चुकता हा सिनेमा थेटरात आणि मल्टीप्लेक्सातच बघणे श्रेयस्कर आहे यारो (टीव्हीवर येईल तेव्हा बघू असा विचार असेल वाट बघा (वाट बघ मेल्या हे एक सलग स्वतःशीच स्वतः या शैलीत बोलावे म्हणजे आपोआप समजेल मला काय म्हणायचे आहे ते समजेल) कारण निखील रत्नपारखीने खुद्द अतुल परचुरे असताना साकारलेला बेरक्या असो किंवा भाऊ कदमने केलेला डॉक्टर असो या सगळ्यांबाबत बोलायचे म्हणजे मूर्खपणा ठरेल. सुहास शिरसाटने केलेला चोरभाऊजी म्हणजे कलाकृतीच्या आणि कल्पनेच्या पलीकडलं काहीतरी आहे. शशिकांत केरकरचा बाबल्या म्हणजे आंगिक अभिनय व त्याला पूरक आणि पोषक असे खास कोकणी ठेवणीतले इरसाल सल्ले देणारा नारबा म्हणजे पर्वणी आहे. मुख्यत्वे सांगायचे तर बाबल्या मेल्या पाव तरी बदल या एका संवादाचा पुढे जावून काही काळानंतर घडत असलेल्या दशावतारात आलेला उल्लेख इतका चपखल आहे की ज्याचं नाव ते !
वर उल्लेख केल्याप्रमाणे निर्जीवांतली नारबाच्या हातातली काठी देखील एक मुख्य पात्र असल्यागत वावरते अख्ख्या सिनेमात आणि त्यानंतर त्याच्या हाती आलेली रंगरावची मुठ असलेली काठीदेखील खूप काही दर्शवून आणि नकळत सांगून जाते.
कितीसे सीन्स असावेत प्रत्येकाला ???
दिलप प्रभावळकर, मनोज जोशी आणि निखील रत्नपारखी वगळता बाकीच्या सगळ्यांचे एकंदर काम हे एकाच हाताच्या बोटांवर भागण्याइतके आहे फार फार तर एखाद दोन दृश्य इकडे तिकडे पण थोरल्या खोताच्या पालखीच्या भोयांपासून ते पंढरीच्या (विकास कदम) मित्राच्या दारूच्या भट्टीवर गेले असता तिथला एक बघ्या या सगळ्यांना डोक्यात कुठं नां कुठं जपून ठेवतच आपण पुढं सरकतो सिनेमात. बरं गाणी हा कायमच मराठी सिनेमाचा आवडीचा भाग आहे आणि राहील पण यातली दोन्ही गाणी इतकी पटकथेची आहेत की त्या गाण्यांना वेगळं आठवणं अशक्य आहे किमान मला कारण ती गाणी जात्यावरच्या ओव्यांसारख्या इतक्या भिनल्या आहेत संपूर्ण कथेत की त्यांना वेगळं आठवायचं तर मला आदर्श शिंदे आणि आनंदी जोशी यांचा जो प्रोमो आहे तोच समोर येतो पण सिनेमात नाही अक्षरशः गाणी संवाद आणि अभिनय इतका एकजीव आहे की त्यांना वेगळं करणं मला जमणार नाही.
कुठल्याही मनोरंजन ब्रीदवाक्यानुसार किंवा एखाद्या ठराविक साच्यानुसार सत्याचा विजय होतो आणि खोटेपणा कधीच जिंकत नाही हे ब्रीदवाक्य कुठल्याही सिनेमाला लागू पडतं तसं या चित्रपटाला देखील लागू पडत असलं तरी (अर्थात इन्वेस्टमेंट या सिनेमाला हे लागू पडत नाही आणि म्हणूनच त्या सिनेमाला आधी जावूनही मला नारबा आधी सांगावासा वाटला, इन्वेस्टमेंट हे आपल्या आजूबाजूच्या जगात घडणाऱ्या खऱ्याखुऱ्या गोष्टीचं इतकं नेमकं चित्रण आहे काही ठिकाणी अतिरंजित सुध्दा माझ्यामते की नीतीमूल्य बिनबुडाची असतात हे मान्य असणारे आपण पडद्यावर नेमकं काहीतरी पुस्तकी घडेल अशी अपेक्षा करत असतो मात्र त्यात असं घडत नाही) ते नारबाच्या वाडीत जे घडतं ते जितकं सोप्पं दिसतं किंवा जितकं सोप्पं वाटतं तितकं नसतं हे ठसवते आपल्या मनावर ही कथा आणि त्याउपर वाईट वागली ती वृत्ती , व्यक्ती नाही आणि त्या वृत्तीला विरोध केलाच पाहिजे पण विरोध म्हणजे बळाचा वापर असं अजिबात नाही हेही ठामपणे मांडलं आहे सिनेमात, बरं गंमत अशी की प्रतिकात्मक म्हणून सहज भीती बाळगणारा एक सामान्य जसा वागेल तसा वागतो म्हणून नारबा आपला वाटतो कदाचित म्हणूनच नेमक्या आवस आणि पुनवेला नारळ ठेवण्याची प्रथा सुरु ठेवणारा नारबा मनात कायमचा राहतो. सामान्य कुणीही उगाच पेटून वगैरे उठत नाही याउलट तो सोयीचे आणि सोपे असे मार्ग शोधते प्रथम हे इतकं सहजतेनं घडतं की त्यावेळी उगा अंधश्रद्धा किंवा श्रद्धा हा विचारही मनाला शिवत नाही आपल्या आठवात नेमका सुरु राहतो तो एका पणतू आणि पणजोबांच्या मधला एक प्रेमळ संवाद आणि एका पिढीची पुढच्या पिढीला शिकवण ...
आपल्या नातवासोबत सुरु झालेला हा अहंकाराचा खेळ खोत पुढेही सुरु ठेवणार आहे याची कल्पना आपल्या पणतूला देताना एका बाजूला जसा तो स्वतःला आणि त्याच्या बापाला म्हणजे नारबाच्या नातवाला जपावं हे अधोरेखित करतो तेव्हाच भूत पिशाच्च खवीस यांच्या बाबतीतला
नारो म्हणे सांगतो आणि आपल्या नकळत नारोबानं अजून पाच पंचवीस वर्ष जगावं अशी इच्छा आपल्या मनात येतेच येते.
समस्त जीवा लावी गोडी नारबाची वाडी टीमला मी “ होय महाराजा “ असा कौल मागतोय आणि मनोमन देतोयसुद्धा ...


Sunday, September 15, 2013

बाप्पाके विसर्जन के टाईम नाचना तो बनता है !

मध्यंतरी एक सिनेमा आला होता एबीसीडी नावाचा ...
हिंदी सिनेनृत्यदिग्दर्शक रेमोने दिग्दर्शक म्हणून केलेला माझ्या अंदाजे दुसरा चित्रपट ...
या सिनेमाची स्टारकास्ट सॉलिड भारी होती
केके मेनन , प्रभुदेवा , गणेश आचार्य आणि वेगवेगळ्या दूरदर्शनवाहिन्यांच्या नृत्य स्पर्धांच्या कार्यक्रमातून नावारूपाला आलेली मुलं आणि मुली ...
अत्यंत सोप्पं असं कथानक पण खिळवून ठेवणारी संपूर्णपणे नाचावर आधारित गाणी यामुळे हा चित्रपट चांगलाच गाजला आणि महत्वाचं असं की याला डान्स आणि डान्स या विषयाला वाहिलेला चित्रपट म्हणून प्रसिद्धी मिळाली होती आणि गंमत अशी की पिक्चर बघताना तेच जाणवलंदेखील
एक प्रख्यात नृत्यदिग्दर्शक एका गल्लाभरू कंपनीतून राजकारणाला कंटाळून बाहेर पडतो आणि गावी परत जात असताना त्याला एका वस्तीमध्ये नाचाचे तंत्र न शिकलेल्या मुलांच्यात नाचाचे गुण दिसतात मात्र शिस्तीची बोंब असते ...
नाचात हृदय हवं फक्त शिक्षणाने सगळं मिळते या मुद्द्याला खोडून काढण्यासाठी या मुलांवर प्रभुदेवा मेहनत घेतो आणि त्यात यशस्वीसुध्दा होतो पण एका स्पर्धेच्या शेवटच्या फेरीला पोचल्यावर या ग्रुपचा परफोरमन्स सर्वात शेवटी होणार असतो त्याचवेळी के के च्या ग्रुपकडून खेळलेली एक चाल लक्षात येते आणि ती म्हणजे यांची जी थीम असते त्याच थीमला जसाच्या तसं उचलून त्याचा ग्रुप त्यांचा शेवटचा नाच पेश करतात ...
प्रभुदेवाच्या टीमला काही सुधरत नाही कारण त्यांच्याच ग्रुपमधल्या एका पोराने बेईमानी केलेली असते पण आता काहीच फायदा नसतो कारण त्यांच्या हातात काही मिनिटं असतात आणि त्यांच्या ग्रुपला स्टेजवर जायचं असतं.
डोक्यात कल्लोळ असताना ही सगळी पोरं आपल्या गुरु म्हणजे प्रभुदेवाकडे येतात आणि आपण हरलो हे कबूल करायची तयारी दाखवतात पण त्याच वेळी प्रभुदेवा एक गोष्ट सांगतो आणि विचारतो ती अशी की नाच ज्याला अजिबातच येत नाही असा माणूस केव्हा नाचणे एन्जोय करतो ? ती वेळ आणि तो क्षण म्हणजे गणपती बाप्पाच्या समोर केलेला नाच कारण यावेळी काहीही बीभत्स नसतं. प्रत्येकजण आपापल्या परीनं उत्तम नाचतो आणि तुम्ही सगळ्यांनी हेच करायचं.
तुम्ही नाचा, तुमचं सर्वस्व ओतून नाचा पण त्यात एक नेमकं करा ते म्हणजे जे नाचाल ते स्वतःच्या आनंदासाठी नाचा , स्पर्धेसाठी नाही.
ही तमाम पोरं एक बेछूट , बेभान करून टाकणारा आणि सगळ्यांना बेहोष करावं असा नाच पेश करतात आणि त्यात यशस्वी होतात.
ह्या नाचाच्या शेवटी खरं तर सिनेमा संपतो पण शेवटच्या काही क्षणात दोन तीन अभिनयाचे अफलातून नमुने पेश होतात त्यातला एक प्रकर्षाने सांगायचा तर के के आणि प्रभू देवा पूर्वी मित्र असतानाचे दिवस केकेला आठवतात आणि तो बाप्पाच्या गाण्याच्या शेवटी उभा राहतो आणि ज्यावेळी स्टेजवर या पोरांनी साक्षात उभा केलेल्या बाप्पाला नमस्कार करतो आणि त्याचवेळी प्रभूदेवाला तू जिंकलास अशी खूणही करतो आणि त्याचवेळी त्या गाण्यावर जो पोरगा बेईमानी ज्यानं बेईमानी केली असते तो सुध्दा सगळं विसरून या नाचात बेभानपणे दाद देत असतो ...
काय आहे काय या नाचात ?
प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एकदा जर गणपतीच्या मिरवणुकीत नाचणं झालं नसेल तर त्यानं एकदा प्रयत्न करावा किंवा त्या नाचाला शिव्या घालणं बंद करावं ...
आपल्याला येत नाही म्हणून जगातल्या कित्येक गोष्टींच्या आनंदाला असेच कर्मदरिद्री म्हणून मुकतो आपण...
दादा कोंडके यांच्या सिनेमाला जाता आलं नाही म्हणून द्विअर्थी संवादांना शिव्या घालणार आणि हळूच मित्राला कानात विचारणार काय रे कसा होता राम राम गंगाराम ?
यात कसली आलीये शाट्याची मजा ?
अनुभव घेणं म्हणजे अनुभव घेणं बास्स ...
षण्मुखानंद मध्ये बघितलं तर लोककला आणि बारीत बघितला तर बाहेरख्याली ?
अरे भडव्यानो !
गंदगी मन मे होती
घाण विचार मनात असतात, गणपतीच्या मिरवणुकीत आजवर किमान वीस वर्षं नाचलो आहे मी आणि आजवर मला एकदाही असं आठवत नाही की आमच्या वाडीतला कुणी गणपती बोळवून आल्याखेरीज अजित पंजाब, योगराज , संदीप किंवा बाकीच्या चार बारची पायरी चढला असेल. हो नंतर काय घडतं यावर साशंकता असेल पण जे करतच नाहीत त्यांना त्या अनमोल आनंदापासून दूर लोटण्याचे पातक कां करताहेत सगळे ?
मी आज अनेकांच्या भिंतीवर बघितले की गणपतीच्या मिरवणुकीतल्या नाचावर अनेकांच्या भुवया उंचावलेल्या दिसल्या मला ,
कां ?
ते अजिबात समजलं नाही बुवा मला !
व्यायामशाळेत गेलो म्हटलं तर डाऊन मार्केट आणि जीममध्ये गेलो म्हटलं की सॉलिड असा दृष्टीकोन असावा सगळ्यांचा.
त्या अगम्य तालावर एरोबिक्स म्हणून ढुंगण हलवलं की बाहेर येताना " यु नो डान्सिंग गीव्स इमेन्स प्लेजर आणि एनर्जी फोर अटलिस्ट अ वीक " असं म्हणालं कुणी की सॉलिड आणि या गणपतीसमोर नाचायला काय पैसे देऊन नाच्ये ठेवायचे ?
एक नक्की आवाज नियंत्रित हवा आणि आपापल्या मंडळाचा एक असा व्यक्ती हवा की ज्याचं बोलणं अजिबात कुणी म्हणजे कुणीच झिडकारू शकत नाही असं असलं की सगळं व्यवस्थित होतं, आणि मी जे बोलतोय ते कल्पनेच्या जोरावर नाही कारण मी कट्टर गणपती विसर्जन सोहळा डान्सर राहिलो आहे एकेकाळी ..
खरंच बॉस ! मी माझ्यापुरतं सांगतो !
मला मी इथं पुण्यात आलो आहे आणि मुंबईचा गणपती डान्स करता येत नाही याचं अत्यंत वाईट वाटतं बुवा !
इथे बेंजो पार्टीसोबत फिरणारे अजय - अतुल गळ्यातले ताईत होतात पण त्याचवेळी ते ज्यांच्यासाठी वाजवायचे ते सगळे लोक नाचायचे हे कसं विसरायचं ?
आज पुण्यातल्या आणि नाशकातल्या ढोलताशाची महती जगभर आहे पण कुणाला ठाऊक आहे कां की ही सगळी पोरं व्यवस्थित नोकरी धंदे सांभाळून हे सर्व करतात आणि पुण्यातल्या बद्दल बोलायचं तर हे वाजवणारे काही मित्र आहेत ते असं म्हणतात की सलग चौवीस तास वाजवूनही या मुलांच्या मधला जोश कमी होत नाही कारण हा जोश दारू किंवा अमली पदार्थ घेऊन आणत नाहीत तर हा जोश असतो या उत्सवाचा ...
जर वाजवणाऱ्याना असा जोश असू शकतो तर मग नाचणाऱ्या पोरांना वाईट म्हणण्यात काय अर्थ आहे ?
हाय कंबख्त तुने पी ही नही म्हणायला जसं दारू लागतेच असं नाही
तसंच जर रोडवरून जाताना एक खल्लास ठेका ऐकू आला आणि त्यावर जर तुमची मान डोलावली नाही तर एकतर तुम्ही ठार बहिरे आहात किंवा तुमच्यातलं माणूसपण संपून मुर्दाड झाले आहात.
अति तिथं माती हा प्रकार मलाही समजतो आणि उडदामाजी काळे गोरे हे नाचाच्या विरोधी असणाऱ्यांना समजलं पाहिजे.
जसं या सोहळ्यात दारू पिऊनच फक्त नाचता येतं असं समजणाऱ्याना बाजूला केलं पाहिजे तसंच जे नाचताहेत ते फक्त धिंगाणा घालायलाच आले आहेत हे समजणाऱ्याना देखील ...
अहो उद्या मंगळागौरीचे नाच पण याच नियमात आणायचा विचार म्हणायला कमी करणार नाहीत या वृत्तीचे लोक ...
फडावर बाई नाचत असेल तर त्या नाचावर दौलतजादा करणारा असतो, खुशीत फेटा उडवणारा असतो आणि नंतर आत जाऊन बाई वाड्यावर येता कां विचारणारासुध्दा असतो ...
जर घाण असेल तर ती ज्याच्या त्याच्या डोक्यात असते, डोक्यातली घाण विचारांनी बाहेर पडत असते, अश्यावेळी ज्या व्यक्तीचा रोजीरोटीचा सवाल असेल तर तो काय आत येणाऱ्या प्रत्येकाची पोलीग्राफी टेस्ट करून आत पाठवणार कां ?
भाईलोग बाप्पाके विसर्जन के टाईम नाचना तो बनता है !
आपको पसंद हो या ना हो !
मी मनातल्या मनात कां होईना पण दीड दिवसाच्या गणपतीपासूनच सुरुवात केली आहे आणि आत्ताच एकाच्या सात दिवसाच्या गणपतीसोबत फुलटू डान्स करून आलोय ...

Thursday, May 23, 2013

कुणा सावलीला एकदा देह मिळाला

कुणा सावलीला एकदा देह मिळाला
देहातून तिचं वारं वाहू लागलं
आणि मग वाऱ्याला खुळ लागलं
असं सगळे म्हणायला लागले ...

कुणा दात्याला एकदा एक सज्जन भेटला
सज्जनाचे कार्य भरभराटीला आले
मग त्याच्या मतीला चळ लागला
असं सगळे म्हणायला लागले ...

कुणा मानवाला एक वरदान मिळालं
मग राज्याची सीमा रुंदावत राहिली
मग वरदानात फक्त बळ राहिलं
असं सगळे म्हणायला लागले ...

खुळा देह सज्जनाला नकोसा झाला
सज्जनाला कार्याच्या आड सीमा आली
बळाला सगळं मिळून सावली मिळेना झाली
हे असं सगळं सगळ्यांना दिसू लागलं ...

माकडांच्या तालावर कोकिळा गाऊ लागली
दौलतजादा करायला कावळे उठू लागले
मूर्तीच्या नादात माणूस काळीज हरवून बसला
गांडूळ मुंग्यांच्या राज्यात सरकारी स्वप्नं पाहू लागलं ....

रंगीत समाज आणि पैसा यांची युती झाली
होळीच्या रात्री मसणवटी जागू लागल्या
माकडाचं माणूस झालं ठाऊक होतं सर्वांना
माणूस नावाचं माकड जागोजागी फिरू लागलं ...

प्र...साद
२४.०५.२०१३

Saturday, January 19, 2013

आज तू म्हणतेस म्हणून परत ...


आटपाट नगरांना पण
पहारेकरी लागतातच
गरज कधीही असली तरी
आपले सोबत असतातच ... अ)

माझं माझं करताना
तू आहेस विसरलो
तूझं माझ्यात असणं
बहकताना समजलो ... ब)

तू येतेस नां रोज
माझ्या अंगणात पहाटे
मीसुद्धा फक्त पाहिलेत
ओढणीत एक दोन काटे ... क)

माझ्या कपाटात फक्त
आठवणी ठेवतो मी
तुझा दरवळ उगाच
कायम शोधतो मी ... ड)

मी पाहिलंय बरंका
तुला जाताना तिकडे एकदा
मी सतत तिथे उभा
लोकांना दिसतो अनेकदा ... इ)

आज तू म्हणतेस म्हणून परत ...

पुन्हा

झोपाळा तो एकाकी मग
सुन्न पोकळी पडवीवरती
माजघरातील ती खुंटीवरची
पुन्हा रिकामी जागा माझी

चाफा अगदी खिन्न एकटा
तुळसही पडली कोमेजून ती
आंब्यावरची एक पालवी
वाट पहाते मागील दारी

मग मागे वळुनी एकदाच मी
दिला दिलासा त्या वळणाला
परतुनी येणे हे भाग्यच आहे
असा संवाद दाराशी झाला

कां पहावे मागे वळुनी
असती डोळे पाणावलेले
एक आठवण सोबत आहे
पुन्हा भेटणे या वळणावर

पुन्हा एकदा मग हातांना
ओझरता मग दिला इशारा
काहूर असता मनाशीच या
आठवणींचा कायम जागपहारा

प्र...साद
हैदराबाद
16.01.2013

सपना मेरा


"सपनोने भी मेरे साथ शायद
आजकल सोचना छोड दिया
किस्सो की क्या बात करें हम
हर अफसाना किताब बना दिया !
प्र...साद