मध्यंतरी एक सिनेमा आला होता एबीसीडी नावाचा ...
हिंदी सिनेनृत्यदिग्दर्शक रेमोने दिग्दर्शक म्हणून केलेला माझ्या अंदाजे दुसरा चित्रपट ...
या सिनेमाची स्टारकास्ट सॉलिड भारी होती
केके मेनन , प्रभुदेवा , गणेश आचार्य आणि वेगवेगळ्या
दूरदर्शनवाहिन्यांच्या नृत्य स्पर्धांच्या कार्यक्रमातून नावारूपाला आलेली
मुलं आणि मुली ...
अत्यंत सोप्पं असं कथानक पण खिळवून ठेवणारी
संपूर्णपणे नाचावर आधारित गाणी यामुळे हा चित्रपट चांगलाच गाजला आणि
महत्वाचं असं की याला डान्स आणि डान्स या विषयाला वाहिलेला चित्रपट म्हणून
प्रसिद्धी मिळाली होती आणि गंमत अशी की पिक्चर बघताना तेच जाणवलंदेखील
एक प्रख्यात नृत्यदिग्दर्शक एका गल्लाभरू कंपनीतून राजकारणाला कंटाळून
बाहेर पडतो आणि गावी परत जात असताना त्याला एका वस्तीमध्ये नाचाचे तंत्र न
शिकलेल्या मुलांच्यात नाचाचे गुण दिसतात मात्र शिस्तीची बोंब असते ...
नाचात हृदय हवं फक्त शिक्षणाने सगळं मिळते या मुद्द्याला खोडून
काढण्यासाठी या मुलांवर प्रभुदेवा मेहनत घेतो आणि त्यात यशस्वीसुध्दा होतो
पण एका स्पर्धेच्या शेवटच्या फेरीला पोचल्यावर या ग्रुपचा परफोरमन्स सर्वात
शेवटी होणार असतो त्याचवेळी के के च्या ग्रुपकडून खेळलेली एक चाल लक्षात
येते आणि ती म्हणजे यांची जी थीम असते त्याच थीमला जसाच्या तसं उचलून
त्याचा ग्रुप त्यांचा शेवटचा नाच पेश करतात ...
प्रभुदेवाच्या
टीमला काही सुधरत नाही कारण त्यांच्याच ग्रुपमधल्या एका पोराने बेईमानी
केलेली असते पण आता काहीच फायदा नसतो कारण त्यांच्या हातात काही मिनिटं
असतात आणि त्यांच्या ग्रुपला स्टेजवर जायचं असतं.
डोक्यात कल्लोळ
असताना ही सगळी पोरं आपल्या गुरु म्हणजे प्रभुदेवाकडे येतात आणि आपण हरलो
हे कबूल करायची तयारी दाखवतात पण त्याच वेळी प्रभुदेवा एक गोष्ट सांगतो आणि
विचारतो ती अशी की नाच ज्याला अजिबातच येत नाही असा माणूस केव्हा नाचणे
एन्जोय करतो ? ती वेळ आणि तो क्षण म्हणजे गणपती बाप्पाच्या समोर केलेला नाच
कारण यावेळी काहीही बीभत्स नसतं. प्रत्येकजण आपापल्या परीनं उत्तम नाचतो
आणि तुम्ही सगळ्यांनी हेच करायचं.
तुम्ही नाचा, तुमचं सर्वस्व ओतून नाचा पण त्यात एक नेमकं करा ते म्हणजे जे नाचाल ते स्वतःच्या आनंदासाठी नाचा , स्पर्धेसाठी नाही.
ही तमाम पोरं एक बेछूट , बेभान करून टाकणारा आणि सगळ्यांना बेहोष करावं असा नाच पेश करतात आणि त्यात यशस्वी होतात.
ह्या नाचाच्या शेवटी खरं तर सिनेमा संपतो पण शेवटच्या काही क्षणात दोन तीन
अभिनयाचे अफलातून नमुने पेश होतात त्यातला एक प्रकर्षाने सांगायचा तर के
के आणि प्रभू देवा पूर्वी मित्र असतानाचे दिवस केकेला आठवतात आणि तो
बाप्पाच्या गाण्याच्या शेवटी उभा राहतो आणि ज्यावेळी स्टेजवर या पोरांनी
साक्षात उभा केलेल्या बाप्पाला नमस्कार करतो आणि त्याचवेळी प्रभूदेवाला तू
जिंकलास अशी खूणही करतो आणि त्याचवेळी त्या गाण्यावर जो पोरगा बेईमानी
ज्यानं बेईमानी केली असते तो सुध्दा सगळं विसरून या नाचात बेभानपणे दाद देत
असतो ...
काय आहे काय या नाचात ?
प्रत्येकाच्या आयुष्यात
किमान एकदा जर गणपतीच्या मिरवणुकीत नाचणं झालं नसेल तर त्यानं एकदा प्रयत्न
करावा किंवा त्या नाचाला शिव्या घालणं बंद करावं ...
आपल्याला येत नाही म्हणून जगातल्या कित्येक गोष्टींच्या आनंदाला असेच कर्मदरिद्री म्हणून मुकतो आपण...
दादा कोंडके यांच्या सिनेमाला जाता आलं नाही म्हणून द्विअर्थी संवादांना
शिव्या घालणार आणि हळूच मित्राला कानात विचारणार काय रे कसा होता राम राम
गंगाराम ?
यात कसली आलीये शाट्याची मजा ?
अनुभव घेणं म्हणजे अनुभव घेणं बास्स ...
षण्मुखानंद मध्ये बघितलं तर लोककला आणि बारीत बघितला तर बाहेरख्याली ?
अरे भडव्यानो !
गंदगी मन मे होती
घाण विचार मनात असतात, गणपतीच्या मिरवणुकीत आजवर किमान वीस वर्षं नाचलो
आहे मी आणि आजवर मला एकदाही असं आठवत नाही की आमच्या वाडीतला कुणी गणपती
बोळवून आल्याखेरीज अजित पंजाब, योगराज , संदीप किंवा बाकीच्या चार बारची
पायरी चढला असेल. हो नंतर काय घडतं यावर साशंकता असेल पण जे करतच नाहीत
त्यांना त्या अनमोल आनंदापासून दूर लोटण्याचे पातक कां करताहेत सगळे ?
मी आज अनेकांच्या भिंतीवर बघितले की गणपतीच्या मिरवणुकीतल्या नाचावर अनेकांच्या भुवया उंचावलेल्या दिसल्या मला ,
कां ?
ते अजिबात समजलं नाही बुवा मला !
व्यायामशाळेत गेलो म्हटलं तर डाऊन मार्केट आणि जीममध्ये गेलो म्हटलं की सॉलिड असा दृष्टीकोन असावा सगळ्यांचा.
त्या अगम्य तालावर एरोबिक्स म्हणून ढुंगण हलवलं की बाहेर येताना " यु नो
डान्सिंग गीव्स इमेन्स प्लेजर आणि एनर्जी फोर अटलिस्ट अ वीक " असं म्हणालं
कुणी की सॉलिड आणि या गणपतीसमोर नाचायला काय पैसे देऊन नाच्ये ठेवायचे ?
एक नक्की आवाज नियंत्रित हवा आणि आपापल्या मंडळाचा एक असा व्यक्ती हवा की
ज्याचं बोलणं अजिबात कुणी म्हणजे कुणीच झिडकारू शकत नाही असं असलं की सगळं
व्यवस्थित होतं, आणि मी जे बोलतोय ते कल्पनेच्या जोरावर नाही कारण मी कट्टर
गणपती विसर्जन सोहळा डान्सर राहिलो आहे एकेकाळी ..
खरंच बॉस ! मी माझ्यापुरतं सांगतो !
मला मी इथं पुण्यात आलो आहे आणि मुंबईचा गणपती डान्स करता येत नाही याचं अत्यंत वाईट वाटतं बुवा !
इथे बेंजो पार्टीसोबत फिरणारे अजय - अतुल गळ्यातले ताईत होतात पण
त्याचवेळी ते ज्यांच्यासाठी वाजवायचे ते सगळे लोक नाचायचे हे कसं विसरायचं ?
आज पुण्यातल्या आणि नाशकातल्या ढोलताशाची महती जगभर आहे पण कुणाला ठाऊक
आहे कां की ही सगळी पोरं व्यवस्थित नोकरी धंदे सांभाळून हे सर्व करतात आणि
पुण्यातल्या बद्दल बोलायचं तर हे वाजवणारे काही मित्र आहेत ते असं म्हणतात
की सलग चौवीस तास वाजवूनही या मुलांच्या मधला जोश कमी होत नाही कारण हा जोश
दारू किंवा अमली पदार्थ घेऊन आणत नाहीत तर हा जोश असतो या उत्सवाचा ...
जर वाजवणाऱ्याना असा जोश असू शकतो तर मग नाचणाऱ्या पोरांना वाईट म्हणण्यात काय अर्थ आहे ?
हाय कंबख्त तुने पी ही नही म्हणायला जसं दारू लागतेच असं नाही
तसंच जर रोडवरून जाताना एक खल्लास ठेका ऐकू आला आणि त्यावर जर तुमची मान
डोलावली नाही तर एकतर तुम्ही ठार बहिरे आहात किंवा तुमच्यातलं माणूसपण
संपून मुर्दाड झाले आहात.
अति तिथं माती हा प्रकार मलाही समजतो आणि उडदामाजी काळे गोरे हे नाचाच्या विरोधी असणाऱ्यांना समजलं पाहिजे.
जसं या सोहळ्यात दारू पिऊनच फक्त नाचता येतं असं समजणाऱ्याना बाजूला केलं
पाहिजे तसंच जे नाचताहेत ते फक्त धिंगाणा घालायलाच आले आहेत हे समजणाऱ्याना
देखील ...
अहो उद्या मंगळागौरीचे नाच पण याच नियमात आणायचा विचार म्हणायला कमी करणार नाहीत या वृत्तीचे लोक ...
फडावर बाई नाचत असेल तर त्या नाचावर दौलतजादा करणारा असतो, खुशीत फेटा
उडवणारा असतो आणि नंतर आत जाऊन बाई वाड्यावर येता कां विचारणारासुध्दा असतो
...
जर घाण असेल तर ती ज्याच्या त्याच्या डोक्यात असते,
डोक्यातली घाण विचारांनी बाहेर पडत असते, अश्यावेळी ज्या व्यक्तीचा
रोजीरोटीचा सवाल असेल तर तो काय आत येणाऱ्या प्रत्येकाची पोलीग्राफी टेस्ट
करून आत पाठवणार कां ?
भाईलोग बाप्पाके विसर्जन के टाईम नाचना तो बनता है !
आपको पसंद हो या ना हो !
मी मनातल्या मनात कां होईना पण दीड दिवसाच्या गणपतीपासूनच सुरुवात केली
आहे आणि आत्ताच एकाच्या सात दिवसाच्या गणपतीसोबत फुलटू डान्स करून आलोय ...

No comments:
Post a Comment