गजाल खरी काय ? व्हय
महाराजा !
दिलीप प्रभावळकर,
मनोज जोशी, विकास कदम, ज्योती मालशे, सुहास शिरसाट, किशोरी शहाणे, अतुल परचुरे,
निखील रत्नपारखी, भाऊ कदम, कमलाकर सातपुते, कमलेश, शशिकांत केरकर आणि (अनेक
या शब्दात जे जे आहेत त्यांनी स्वतःला समजून घ्यावं कारण कुणाचाही उल्लेख करू नये
असं नाही) किती नावं घेऊ ? कारण ज्या ज्या कलाकारांची नावं घेतोय तिथं या
नावांपाशी नारबाची वाडीच्या वेस लागते फक्त अख्खी वाडी पालथी घालायची असेल तर
निर्माते गुहा यांच्यासोबत इथं या वाडीच्या गडग्यापाशी यावे लागेल , गडग्याच्या
दगडादगडात आणि कुपणीच्या फिरवलेल्या सुंभाच्या पिळात प्रत्येक कलाकाराने दिलेलं
योगदान आहे आणि ते दर्शन झालं की मग अदित्य सरपोतदारच्या सोबतीनं वाडीतल्या प्रत्येक
ठिकाणाची आणि त्यातल्या सजीव आणि निर्जीव (???यातल्या निर्जीव गोष्टीदेखील काही
नां काही बोलतात राव) गोष्टींची ओळख करून घ्यावी लागेल...
कारण या वाडीला आपण
नवे असू असं आपल्याला वाटेल पण एकदा आत आलो की तिथल्या प्रत्येक घटनेचे साक्षीदार
कधी बनतो ते अगदी सिनेमा संपेतो आपल्याला समजत नाही अजिबात आणि बाहेर येताना वाडीला
परत यावं याचे समीकरण बांधतच आपण बाहेर येतो.
बंगाली संस्कृती आणि
मराठी संस्कृती यात एक विलक्षण साम्य आहे यावर मी बोलणे म्हणजे उगाच आपल्या
सगळ्यांचा अनाठायी वेळ खाणं होईल हे खरं असलं तरी मूळ संकल्पना बंगाली आहे त्याला
इतका सुरेल आणि सुरेख न्याय गुरु ठाकूर व्यतिरिक्त कुणी देऊ शकलं असतं तर ते स्वतः
बासुदा , हृषिदा किंवा गुलजार असावे लागले असते अन्यथा कठीण आहे हे इतकं आणि इतकंच
सांगून गुरुचे श्रेय संपणार नाही पण ठायी ठायी गुरु ठाकूर स्पर्श जाणवत राहतो आणि
अदित्य एक दिग्दर्शक म्हणून या अनुभवाला उगाच स्वतःची भट्टी जमवण्यासाठी काही
त्रास न देता अधिक गडद करतो आणि इथे अगदी इथेच या सिनेमातली प्रत्येक फ्रेम
स्वतःची म्हणून वावरते आणि त्यावर कुणाचाही प्रभाव असा न राहता अख्ख्या सिनेमाचा
प्रभाव पडतो.
मी परीक्षण किंवा
समीक्षण करण्याजोगा मानतच नाही मला कारण माझा मुद्दाच मुळी दाद देणे अथवा गप्प
बसणे असा असतो कारण प्रत्येक कलाकृतीला स्वतःचा बाज असतो आणि आपण अनेकदा आपल्याला
त्या त्या ठिकाणी स्वतःला ठेवून बघतो आणि ते पटलं तर आपल्याला आवडलं असं म्हणतो
आणि नाही पटलं की बेक्कार म्हणून ओरड करतो जे मला पटत नाही आणि म्हणूनच मी कायम
निरीक्षण करतो (काल अदित्यशी फेसबुकवर मेसेजमधून हेच मी लिहून कळवले तेव्हा त्याने
म्हटले की उत्तम निरीक्षण केले तरच परीक्षण जमते असं त्याचं मत माझ्या कानावर
त्यानं घातलं आहे पण त्याच्या बोलण्याकडे मी त्याच्या पुढच्या सिनेमासाठी राखून
ठेवतो स्वतःला)
“ नारबाची वाडी “ काय आहे असं म्हटलं तर ही एक एक तळकोकणातली साधीसुधी घटना म्हणावी तरी चालेल
आणि तसं नाही म्हणायचं असं जर ठरवलं तर एका श्रीमंताने अट्टाहासाने स्वतःचा हट्ट
पूर्ण करायच्या नादाला एका तुमच्या आमच्या सारख्या माणसानं आणि त्याच्या सोबतीला
असलेल्या सच्चेपणाने दिलेली लुटुपुटुची लढाई म्हणायचं.
मराठीत दोन म्हणी
आहेत नां की हातचं सोडून पळत्याच्या पाठी लागू नये / अन्यथा तेलही गेलं आणि तूपही
गेलं हाती राहिलं धुपाटणे या दोन्ही म्हणींचा प्रत्यक्ष साक्षात्कार म्हणजे आहे
नारबाची वाडी.
ही अख्खी कथा तीन
कालखंडात घडते असं मानलं तरी मूळ आकृतिबंध इतका ठाशीव आहे की कथा स्वतःचा वेग सोडत
नाही किंवा आपल्यालाही त्या वेगापासून वेगळं होऊ देत नाहीत ही कमाल इथं दिग्दर्शक
म्हणून अदित्य सरपोतदार आणि पटकथा / संवाद कर्ता गुरु ठाकूर यांची आहे.
अख्ख्या गावावर
जवळजवळ स्वामित्व असलेला खोत एका हव्यासापायी आपली संपत्ती आणि जीव कसा गमावून
बसतो आणि त्याच्या या प्रयत्नाला अत्यंत सहजतेने आणि आपल्या परीने आडकाठी करणारे
आजोबा इतकीच कथा खरं तर पण एकटे आजोबा कुठंही सुपरहीरो असल्याचा आव आणत नाहीत
किंवा तसं चुकुनही प्रेक्षक म्हणून आपल्याला जाणवत नाही. माणूस एखाद्या प्रसंगात
सरधोपटपणे कसा वागेल तसंच अगदी तसंच वागणं दाखवलं गेलं आहे आणि इथंच या सिनेमाचे
वेगळेपण आहे.
अत्यंत साधंसोप्पं असलेलं तसच्या तसं पडद्यावर आणणंच खूप मोठ्या ताकदीचे आहे आणि हे सर्वांनी पेललं आहे अगदी समर्थपणे.
अत्यंत साधंसोप्पं असलेलं तसच्या तसं पडद्यावर आणणंच खूप मोठ्या ताकदीचे आहे आणि हे सर्वांनी पेललं आहे अगदी समर्थपणे.
एका सरळ मार्गाने
सांगायचं तर सिनेमा सुरु होतो तोच मुळी सिनेमाच्या दोनपैकी एका गाण्यावर सिनेमाची
टायटल्स येतात तेव्हा आणि नेमका याच क्षणी आपण या सिनेमाच्या प्रेमात पडतो, पूर्वी
लक्ष्या आणि अशोक सराफ जोडगोळीचे सिनेमे चालायचे तेव्हा एक कार्टून स्वरूपातल्या
टायटल्सची क्रेझ आली होती नंतर त्याचा आणि त्या प्रकारच्या सिनेमाचा इतका बाजार
वाढला की दोन्हीवर लोकांनी सपशेल बहिष्कारच घातला पण “ नारबाची वाडी “ ची टायटल्स येतातच ती मुळी सुखद धक्के घेऊन,
क्षणभर आपल्याला आपण आलोय तिथं चुकून मालगुडी ‘डे’स किंवा आर के लक्ष्मण
याच्या मालिकेची नामावली दाखवताहेत की काय असा भास होतो पण मग प्रत्येक फ्रेमला
सजवलेल्या रुपात आपल्याला आपले दिलीपकाका, मनोज जोशी , अतुल परचुरे , निखील
रत्नपारखी दिसायला लागतात आणि आपण आपोआप गुणगुणायला लागतो गजाल खरी काय ?
मनोज जोशीने
केलेल्या थोरल्या (रंगेल) आणि त्याच्या मुलाच्या या खोताच्या केलेल्या दोन्ही
भूमिका व त्यातले कंगोरे, दोन्हींना वेगळं करणारी देहबोली आणि आवाज इतका नेमका
वठवला आहे की आजवरच्या कुणाच्याही दुहेरी भुमिकेचा उल्लेख जर कां मराठीत करणार असेल
तर न चुकता न विसरता ही भुमिका पहिल्या तिघात असेल यात मला शंका नाही.
दिलीप प्रभावळकर
यांच्याबाबत मी काही लिहिणं किंवा बोलणं म्हणजे रोज मुलुंडला सकाळी ब्रिजखाली
उभ्या राहणाऱ्या आणि काम मिळवणाऱ्या कढीयाच्या हाताखालच्या बेगारयाने ताजमहाल असा
बनवला असावा या विषयावर बोलण्यासारखे आहे त्यामुळे मला ते मान्यच नाही. एकच सांगेन
मित्रांनो की कोकणातला म्हातारा असं म्हटल्यावर आपल्यातल्या निम्म्याहून अधिक
लोकांच्या डोक्यात अंतू बर्वा तरी येतो किंवा एखादा पिचलेला गडी पण दिलीपकाकांचे
पात्र हा एक सर्वसामान्य कोकणातला माणूस असला तरी त्याच्या विचारांना अध्यात्माची बैठक
आहे आणि ही बैठक इतकी गाढ आहे की हा कोकणातला सरळ (??? कोकणातला आणि सरळ असं
प्रश्नचिह्न तुमच्या चेहऱ्यावर पडलं असेल तरी मी सांगतोय ते शंभर टक्के खरं आहे की
हा आज्या मनपासून देवभोळा आणि स्वतः चांगले केले की चांगले फळ मिळते या तत्वावर
जगणारा आहे) माणूस गावच्या खोताच्या कुठल्याश्या आधीच्या पिढीतल्या माणसाचे प्राण
वाचवले म्हणून ही जागा खोताने बक्षीस म्हणून दिल्याची जाण असतानाच त्यासोबत त्या
जागेचा कागद असल्याची व्यावहारिक आणि हिशोबी वृत्तीसुद्धा आहे त्याकडे. ती जागा
आपल्या वाडवडिलार्जीत नसली तरी आपल्या श्रमांनी आणि मेहनतीने ही जमीन सुपीक
केल्याचा सार्थ अभिमान असतानाच त्याला आपण श्रम केले की ही जागा आपल्याला
जगण्यासाठी आणि जगवण्यापुरते देते हे त्याला नेमकं ठाऊक आहे आणि म्हणूनच तो या
वाडीला आपली वाडी जेव्हा जेव्हा संबोधतो तेव्हा तेव्हा माऊली म्हणून उल्लेख करतो.
या अश्या वृत्तीने आलेलं शहाणपण आणि समज यासोबत आपल्या लेकीच्या मुलाचा सांभाळ
करताना त्याला काय हवं नको ते पहाताना त्यानं आपल्याप्रमाणेच या जागेवर जीव लावावा
इतकाच कुठेही न बोलून दाखवलेला हट्टदेखील दिलीप प्रभावळकर अत्यंत नेमक्या शैलीत
सादर करतात.
थोडासा विषयावरून
भरकटतो पण आत्ता हे गरजेचे आहे म्हणूनच
मध्यंतरी अनुमती
नावाचा एक सुंदर चित्रपट पाहण्यात आला (सुंदर हे विशेषण विक्रम गोखले या नावाशी
सुरु होतं आणि तिथंच संपतं) त्यात श्रीवर्धनचा उल्लेख आणि काही दृश्य आहेत. या
गावात किशोर कदम एक गावकरी आणि विक्रम गोखले यांचा शेजारी दाखवला आहे. किशोर कदम
यांच्यासारखा एक ताकदीचा नट पाट्या टाकल्याप्रमाणे जेव्हा कोकणी हेल काढून बोलतो
तेव्हा हसावं कां रडावं टच कळत नाही कारण कोकणात जिल्ह्यातील भागांनुसार बोलीभाषा
बदलते पण म्हणून तळकोकणातली मालवणी भाषा श्रीवर्धनच्या माणसाच्या तोंडी कशी काय
आली ? बरं लिहित्या माणसाला कोकणी म्हटल्यावर या प्रकारचे संवाद ठाऊक असावेत पण
लिहित्याला नाही समजले ते बोलत्या आणि बघत्या लोकांनाही समजू नये हा घोळ ?
आता तुम्ही म्हणाल प्रसाद अरे नारबाच्या वाडीत अनुमतीला कशाला आणलेस ?
आता तुम्ही म्हणाल प्रसाद अरे नारबाच्या वाडीत अनुमतीला कशाला आणलेस ?
देतोय त्याचेच
स्पष्टीकरण देतोय ...
दिलीप प्रभावळकर हे
जरी खालच्या अशिक्षित दाखवले असले तरी त्यांच्यावर आध्यात्मिक संस्कार आहेत हे मी
जेव्हा सांगितलं तेव्हाच या नारो, नारबा किंवा आज्याच्या तोंडी वेळेनुरूप संवाद
येतात आणि त्याचमुळे पटकथा किती जोरकस असावी याचा प्रत्यय गुरु देतो आणि हे असं आहे
आणि कां आहे याचा विचार निर्मात्यांपासून नटांपर्यंत सतत सांभाळून नेणाऱ्या
दिग्दर्शक म्हणून अदित्य सरपोतदार याचे कौतुक करावे तितके थोडे आहे. सिनेमाला
पुरस्कार मिळाला किंवा किती पटकन पूर्ण झाला यावरचे गैरसमज जितके दूर होतील तितकं
बरं आहे मराठी सिनेमासाठी कारण या प्रकारात एखादा चांगला विषय किंवा चांगली कलाकृती
प्रेक्षकांच्या नजरेस पडायच्या आत नाहीशी होण्याची भीती वाटते.
किशोरी शहाणे
हिच्याकडून जसा अभिनय अभिप्रेत आहे तेवढाच आवश्यक असल्याने तिने मनोज जोशीच्या
बायकोची (मठ्ठ) भूमिका उत्कृष्ट साकारली आहे (इथं भूमिका आणि अभिनय यापैकी भूमिका
या शब्दाला मठ्ठ जोडून घ्यावा अन्यथा विपर्यास होण्याची शक्यता आहे), अंबरीश
देशपांडे याने मनोजच्या मुलाच्या अत्यंत छोट्याश्या भूमिकेचे सोने केले आहे, नेमकं
प्रत्येकाचा आपापल्या सीननुसार उल्लेख जरी करायचा म्हटलं तर किमान सिनेमाच्या
लांबीचे कागद संपतील पण माझं पुरण संपणार नाही. पण ज्योती मालशे हिने साकारलेली
मंजू (विकासची जम्मू) ही एका त्याकाळच्या सिनेनटीची हुबेहूब प्रत आहे हे लक्षात
आल्यावर अंबरीशने केलेला अभिनय, त्यावेळचे विकास कदमचा फक्त चेहरा, ज्योतीने
फेकलेली दोन तीन वाक्य आणि दिलीपकाकांची फक्त बघ्याची भूमिका हा सीन एकाचवेळी अनेक
सीन्सना टक्कर देईल असा झाला आहे. खरं सांगायचं तर या टीमचा म्हणजे सगळ्यांचा
सांघिक अभिनय बघायचा असेल तर न चुकता हा सिनेमा “थेटरात“ आणि मल्टीप्लेक्सातच बघणे श्रेयस्कर आहे यारो (टीव्हीवर
येईल तेव्हा बघू असा विचार असेल वाट बघा (वाट बघ मेल्या हे एक सलग स्वतःशीच स्वतः या
शैलीत बोलावे म्हणजे आपोआप समजेल मला काय म्हणायचे आहे ते समजेल) कारण निखील
रत्नपारखीने खुद्द अतुल परचुरे असताना साकारलेला बेरक्या असो किंवा भाऊ कदमने
केलेला डॉक्टर असो या सगळ्यांबाबत बोलायचे म्हणजे मूर्खपणा ठरेल. सुहास शिरसाटने
केलेला चोरभाऊजी म्हणजे कलाकृतीच्या आणि कल्पनेच्या पलीकडलं काहीतरी आहे. शशिकांत
केरकरचा बाबल्या म्हणजे आंगिक अभिनय व त्याला पूरक आणि पोषक असे खास कोकणी
ठेवणीतले इरसाल सल्ले देणारा नारबा म्हणजे पर्वणी आहे. मुख्यत्वे सांगायचे तर
बाबल्या मेल्या पाव तरी बदल या एका संवादाचा पुढे जावून काही काळानंतर घडत असलेल्या
दशावतारात आलेला उल्लेख इतका चपखल आहे की ज्याचं नाव ते !
वर उल्लेख केल्याप्रमाणे निर्जीवांतली नारबाच्या हातातली काठी देखील एक मुख्य पात्र असल्यागत वावरते अख्ख्या सिनेमात आणि त्यानंतर त्याच्या हाती आलेली रंगरावची मुठ असलेली काठीदेखील खूप काही दर्शवून आणि नकळत सांगून जाते.
कितीसे सीन्स असावेत
प्रत्येकाला ???
दिलप प्रभावळकर,
मनोज जोशी आणि निखील रत्नपारखी वगळता बाकीच्या सगळ्यांचे एकंदर काम हे एकाच हाताच्या
बोटांवर भागण्याइतके आहे फार फार तर एखाद दोन दृश्य इकडे तिकडे पण थोरल्या खोताच्या
पालखीच्या भोयांपासून ते पंढरीच्या (विकास कदम) मित्राच्या दारूच्या भट्टीवर गेले
असता तिथला एक बघ्या या सगळ्यांना डोक्यात कुठं नां कुठं जपून ठेवतच आपण पुढं
सरकतो सिनेमात. बरं गाणी हा कायमच मराठी सिनेमाचा आवडीचा भाग आहे आणि राहील पण
यातली दोन्ही गाणी इतकी पटकथेची आहेत की त्या गाण्यांना वेगळं आठवणं अशक्य आहे
किमान मला कारण ती गाणी जात्यावरच्या ओव्यांसारख्या इतक्या भिनल्या आहेत संपूर्ण
कथेत की त्यांना वेगळं आठवायचं तर मला आदर्श शिंदे आणि आनंदी जोशी यांचा जो प्रोमो
आहे तोच समोर येतो पण सिनेमात नाही अक्षरशः गाणी संवाद आणि अभिनय इतका एकजीव आहे
की त्यांना वेगळं करणं मला जमणार नाही.
कुठल्याही मनोरंजन
ब्रीदवाक्यानुसार किंवा एखाद्या ठराविक साच्यानुसार सत्याचा विजय होतो आणि खोटेपणा
कधीच जिंकत नाही हे ब्रीदवाक्य कुठल्याही सिनेमाला लागू पडतं तसं या चित्रपटाला
देखील लागू पडत असलं तरी (अर्थात इन्वेस्टमेंट या सिनेमाला हे लागू पडत नाही आणि
म्हणूनच त्या सिनेमाला आधी जावूनही मला नारबा आधी सांगावासा वाटला, इन्वेस्टमेंट
हे आपल्या आजूबाजूच्या जगात घडणाऱ्या खऱ्याखुऱ्या गोष्टीचं इतकं नेमकं चित्रण आहे
काही ठिकाणी अतिरंजित सुध्दा माझ्यामते की नीतीमूल्य बिनबुडाची असतात हे मान्य
असणारे आपण पडद्यावर नेमकं काहीतरी पुस्तकी घडेल अशी अपेक्षा करत असतो मात्र त्यात
असं घडत नाही) ते नारबाच्या वाडीत जे घडतं ते जितकं सोप्पं दिसतं किंवा जितकं
सोप्पं वाटतं तितकं नसतं हे ठसवते आपल्या मनावर ही कथा आणि त्याउपर वाईट वागली ती
वृत्ती , व्यक्ती नाही आणि त्या वृत्तीला विरोध केलाच पाहिजे पण विरोध म्हणजे
बळाचा वापर असं अजिबात नाही हेही ठामपणे मांडलं आहे सिनेमात, बरं गंमत अशी की
प्रतिकात्मक म्हणून सहज भीती बाळगणारा एक सामान्य जसा वागेल तसा वागतो म्हणून
नारबा आपला वाटतो कदाचित म्हणूनच नेमक्या आवस आणि पुनवेला नारळ ठेवण्याची प्रथा
सुरु ठेवणारा नारबा मनात कायमचा राहतो. सामान्य कुणीही उगाच पेटून वगैरे उठत नाही
याउलट तो सोयीचे आणि सोपे असे मार्ग शोधते प्रथम हे इतकं सहजतेनं घडतं की त्यावेळी
उगा अंधश्रद्धा किंवा श्रद्धा हा विचारही मनाला शिवत नाही आपल्या आठवात नेमका सुरु
राहतो तो एका पणतू आणि पणजोबांच्या मधला एक प्रेमळ संवाद आणि एका पिढीची पुढच्या
पिढीला शिकवण ...
आपल्या नातवासोबत सुरु झालेला हा अहंकाराचा खेळ खोत पुढेही सुरु ठेवणार आहे याची कल्पना आपल्या पणतूला देताना एका बाजूला जसा तो स्वतःला आणि त्याच्या बापाला म्हणजे नारबाच्या नातवाला जपावं हे अधोरेखित करतो तेव्हाच भूत पिशाच्च खवीस यांच्या बाबतीतला “ नारो म्हणे” सांगतो आणि आपल्या नकळत नारोबानं अजून पाच पंचवीस वर्ष जगावं अशी इच्छा आपल्या मनात येतेच येते.
आपल्या नातवासोबत सुरु झालेला हा अहंकाराचा खेळ खोत पुढेही सुरु ठेवणार आहे याची कल्पना आपल्या पणतूला देताना एका बाजूला जसा तो स्वतःला आणि त्याच्या बापाला म्हणजे नारबाच्या नातवाला जपावं हे अधोरेखित करतो तेव्हाच भूत पिशाच्च खवीस यांच्या बाबतीतला “ नारो म्हणे” सांगतो आणि आपल्या नकळत नारोबानं अजून पाच पंचवीस वर्ष जगावं अशी इच्छा आपल्या मनात येतेच येते.
समस्त जीवा लावी
गोडी नारबाची वाडी टीमला मी “ होय महाराजा “ असा कौल मागतोय आणि मनोमन देतोयसुद्धा ...

