चोचौचंचः जे मनात उमटतं ते तसं तसंच्या तसंच

Thursday, December 13, 2012

बंधनाचे नाही मौताज आम्ही

कुठल्याही बंधनाचे नाही मौताज आम्ही
आले मना तेव्हाच गायली भूपाळीही आम्ही
कधी कोणता राग गायचा हे कुणी कां ठरवायचे?
अंतरीची साद फक्त आपली हेच जाणतो आम्ही
प्र...साद
पुणे
१३.१२.२०१२

Thursday, December 6, 2012

माझ्याच मनात

आज उन्हाला एक सावली
माझ्याच मनात
परत वाकून माझीच मी पाहिली
माझ्याच मनात

घोटून घेतलेले सगळे पाढे
माझ्याच मनात
कानामात्रांचे शब्दाला वेढे
माझ्याच मनात

दगडोबा देवात की देव दगडोबा
माझ्याच मनात
प्रेमाचा हात असणारे आजोबा
माझ्याच मनात

किंतु परंतु आणि व सुद्धा
माझ्याच मनात
बेदरकार लढाऊ योद्धा
माझ्याच मनात

बडबड गीतांचा पाउस
माझ्याच मनात
आत्ता नको ना रे जाउस
माझ्याच मनात

अस्थिर थरथरणारी पावले
माझ्याच मनात
काचेच्या आतले जे जे भावले
माझ्याच मनात

खिश्याच्या आतली चिल्लर
माझ्याच मनात
जी काही गाणी थिल्लर
माझ्याच मनात

धगधगणार आज चिता
माझ्याच मनात
उमटणार आज कविता
माझ्याच मनात

प्र...साद
०७.१२.२०१२
पुणे

Wednesday, December 5, 2012

अस्पष्ट

मनातले भाव उमटती
कधी शब्द तर कधी रंग
भावभावना गोंधळातली
स्पष्ट होतसे कागदावरी

Sunday, December 2, 2012

मी पण आहे इथे

तसा भीतभीतच जगतो आपण
काल थोडा वेगळेपणा पाहिला

सुरक्षित जगायला थोडी भीती हवी
पण म्हणून जगायची भीती नको


श्वास घेताना काही वेळ थांबायचे
त्या दोन श्वासात थोडा विचार करायचा

प्रत्येक विचारात भीती डोकावायला नको
प्रत्येक पावलात असुरक्षित वाटायला नको

आपले आपण स्वतःलाच सांगायचे
भीतीच्या भूताला बाजूला ठेवायचे

अंधारात सावल्या खूप भय देतात ना ?
या सावल्याच खेळ बनून हसवतात ना ?

आपलेच प्रतिबिंब आपल्याला नाही घाबरवत
मग इतरांनी कसे वागावे आपणच ठरवायचे

जर कधी वाटलेच तरीही की खूप आहे भीती
तर म्हणायचे की ही पण एक अनुभूती

भीती कधी म्हणालीच की मी आहे बर का इथे
सांगून टाकायचे एकदाच तिला मी पण आहे इथे

प्र...साद
पुणे
०२.१२.२०१२
When you feel that I feel a FEAR
You just need to tell yourself I AM HERE

तोच क्षण जगण्याचा

आज सूर्यास्त होताना गहिवरून आले होते
आज चंद्र उगवताना पाहिला मी
कालचे पान आजवर उलटताना थांबलो मी
आजमध्ये कालची शिल्लक पुढे घेताना बरे वाटले
कशाला लावलेत ते गेलेल्याचे फोटो घरभर ?
आज त्याची वाक्ये आठवल्यावर चंदन दरवळला
मी माझाच आहे की नाही हा प्रश्न जेव्हा पडला मला
दोस्ता कालच्या मैफिलीत हवा होतास तू
नदीच्या या काठावरून जाताना पैलतीर इकडचा दूर
आज या काठावरून तिकडचा खूप लांबचा
मी जिथे तोच क्षण जगण्याचा माझा
मी आहे इथे हा विश्वासच महत्वाचा
प्र...साद
०२.१२.२०१२

कधीमधी एकटेपणा पण जरूरी आहे

इतके एकटे एकटे वाटतेय ?
जाउद्या कधीमधी एकटेपणा पण जरूरी आहे
सोबत आहे म्हणताय ? तरी एकटे आहात ?
मग एक काम करा , सोबतीला एकटेपणा आहे म्हणा :)

Tuesday, October 30, 2012

मनातच


मनातच...
1) साद ऎकू येतसे
शीळ ती गुंजतसे
पावा ओठी बोलतसे
माझिया मना . . .
2) केशवाची आण
जणू सावित्रीचे वाण
एकलव्याचा तो बाण
माझिया मना . . .
3) गर्दीतही मी मुका
माझाच मी एक सखा
कवटाळूनी या दु:खा
माझिया मना . . .
4) जाते गलबत एकटे
शीडही ना सोबती
धसमुसळे ते वारे
माझिया मना . . .
प्र...साद
28.10.2012

Wednesday, October 24, 2012

पोर ते


त्या वेदनांना कवटाळूनी उराशी
नागडे पोर ते ...
संभाव्य धोक्यांची गर्दी जराशी
पोरके पोर ते ...
जगणे जरासे ही आशा मनाशी
भाबडे पोर ते ...
जाणिवांना ठेऊनी मनतळाशी
जागते पोर ते ...
आज आपुला सोबत स्वप्नांशी
हासते पोर ते ...
प्र...साद
23.10.2012

अर्घ

खिन्न वाटांना दूर सारीत आलो
मनमळभाला आज अर्घ देऊनी आलो
आज माझेच मला मी समजावीत आलो
नव्या दिशांनी मार्ग माझाच मी कोरीत आलो
प्र...साद
21.10.2012

माझिया मना रे

ये जाऊनी फिरोनी
माझिया मना रे !
मी आहे नेमका कोठे
कां कोणी मला विचारे ?
प्र...साद
22.10.2012

Sunday, October 21, 2012

मयत माझं

आले मयतास माझ्या
न बोलावता हे सगळे
मला उमजलेच नाही
ते ताटीचे चार वेगळे
प्र...साद
21.10.2012

गुंता



  • माझेच मजला समजले
    कां शोधतो मी काही
    माझाच हात हाती
    गुंता सुटतच नाही
    प्र...साद
    21.10.2012

इथे एकदा काळजाने झरावे

इथे एकदा काळजाने झरावे,
पुन्हा एकदा तेथेची वार व्हावा,(प्रसाद)
मरण यातना भोगताना ही,
मला तुझाच चेहरा स्मरावा....(नंदू दा ) Nandu Sawant

केली कशाला अशी ही व्यवस्था
नव्या कवितेने इथे जन्म घ्यावा
भोगुनी आलो सर्व योनिव्यथा मी
हा न्याय कुठला ? चेहरा तुझा ना दिसावा (प्रसाद)

मी जागवीत होतो जुन्या कल्पना त्या
आविष्कार तुझा मज समोरीच कां व्हावा ?
या संवेदना झाल्या जणू भाषाच माझ्या
संवाद नेमका कां मुक्यानेच व्हावा ? (प्रसाद)

फिरोनी आलीस ठाऊक आहेच मजला
रस्ता तुझ्या अबोलीनेही कां सुगंधित व्हावा ?
प्राजक्त होता तुझ्या अंगणी अन माझ्याही दारी
मधुमास सोबतीचा का सये कोरडाच यावा ?(प्रसाद)

इथे एकदा काळजाने झरावे,
पुन्हा एकदा तेथेची वार व्हावा....(प्रसाद)

प्र...साद जोशी.
१५.१०.२०१२

गोतावळा

गोतावळ्यात सार्या
मी जणू एकला
एकही कान नाही
अव्यक्त बोलण्याला !
प्र...साद
21.10.2012

Tuesday, July 24, 2012

कशाला उद्या ?

रात्रीच्या त्या एकट्या प्रहरी
थकून निजल्या दुकान दारी
चंद्रही असतो नव्हती जाणीव कधी
आज झाला उद्याचीच भीती काळजामधी
प्र...साद
३०.०५.२०१२

चंद्रशेखर गोखले

एका ओळीत म्हणे
सगळे शब्द उभे राहायचे
शेखरदा चारोळीत घेईल म्हणून
स्वतःहूनच वाट पहायचे

प्र...साद
कधी होते व्यक्त कधी राहते मनातच
कोपऱ्या कोपऱ्यातून मी शब्द उगीच वेचले
मग सगळ्यांनी सांगितले मलाच 
वेचणे शब्द पुरे आता, वाच चंद्रशेखर गोखले 

छंद

तो नव्याकोऱ्या पुस्तकाचा गंध
मनात खोलवर घर करून राहतो
लाईक आणि ट्यागचाही एक छंद
आत्ता आत्ता वाटे तोवरच जुनासा होतो

माझा तसा नेम नाही

मला झोप कां येत नाही
कहर म्हणजे मी कधी झोपतच नाही
झोपलो तर गहजब होईल
मी स्वतःहून कधी उठेन याचाही नेम नाही

हवं तसं जगायला

हवं तसं जगायला
जगण्यावर प्रेम करावं
स्वतःला रडू येताना
सतत इतरांना हसवावं
प्र...साद

जगाची रीत

ठेचल्यावाचून पुढे जायचे नाही ही जगाची रीत आहे
"माझी रेष मोठी" पेक्षा दुसऱ्याची छोटी करणे फार सोपं आहे
निंदा नालस्ती हा आपला प्रमुख धंदा आहे
काम कशाला करायचं आपला रुपया एकदम बंदा आहे !

दुसऱ्याला कधी बोलू दिलंच तर ते फक्त प्रास्ताविक असतं
प्रमुख भाषण आपलंच हे दर सभेत निश्चित असतं
माणुसकी वगैरे मध्ये मला फारसा रस नाही
आत्मस्तुती चुकीची असं मला कधीच वाटत नाही

कात्री चालवायचं शिक्षण हेच मुख्य कामकाज आहे
कधी फिती,कधी खिसे,कधी मागचे दोर असा फार उपयोग आहे
प्र...साद