चोचौचंचः जे मनात उमटतं ते तसं तसंच्या तसंच

Friday, October 23, 2009

मी कां अन् कोण कुणी सांगावे ?

मी सर्वत्र
मी निमित्तमात्र
मी एक सुख
मी दाटलेले दुःख
मी फाटलेली डायरी
मी रिकामी कुयरी
मी गाळलेला शब्द
मी अक्खा निबंध
मी तरी सर्वत्र
मी जीवंत मात्र
मी कां जगात
मी कां सुखात
मी मानतो मी आहे
मी जाणतो कुणी आहे
मी कोण कुणी सांगावे
मी कां मला सांगावे
मी जरी मी आहे
मी कां अन् कोण कुणी सांगावे ?

प्र.....साद जोशी
पुणे
२४.१०.२००९

Tuesday, October 13, 2009

जीवंत असल्याची जाणीव

एकदा एका राज्यात निवडणूक झाली
मी एकटाच उभा होतो उमेदवार म्हणुन
सभापती पण मीच आणि निर्वाचन आयोग पण मीच होतो
नागरीक तसे खूप होते पण मतदान करणारा पण मीच होतो !

फार विचित्र झाली निवडणूक, अगदी एका मतानी जिंकलो मी
कुणीच हारतुरे आणले नाहीत की बैंडबाजा वाजला नाही
मीच माझी शपथ घेतली आणि त्या स्मशानभूमीचा मुख्यमंत्री झालो
आता प्रत्येक येणारया नागरिकाला मला दान देवूनच जायला लागणार

मी पण प्रत्येक नागरीक कसा जळतोय, याची नीट शहानिशा करणार
काहीही झाले तरी मुख्यमंत्री म्हणून माझ्याही काही जबाबदारया आहेत की नाही?
प्रत्येक जण नीट मेला की मी वोटर लिस्ट मधून त्याचे नाव कमी नाही करणार
मी त्याचे नाव जन्माच्या नोंदणीला पाठवणार, एक वोटर माझ्याच लिस्ट मध्ये वाढवणार

काही वर्षांनी परत निवडणूका येणार, माझे टिकिट मी माझ्या मुलाला देणार
आता माझे वय झालेय, या पुढे स्मशानाची काळजी माझा मुलगा घेणार
या राज्याचे स्मशान झाल्याचे कधीच कुणाला नाही समजणार
कारण अगदी स्पष्ट आहे, जीवंत असल्याची जाणीव आम्ही कुणालाच नाही होऊ देणार

कारण अगदी स्पष्ट आहे, जीवंत असल्याची जाणीव आम्ही कुणालाच नाही होऊ देणार

प्र....साद जोशी
पुणे
१३.०१०.२००९